ठाणे : देशात रामराज्य आणायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रामराज्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले आहे. देशाची वाटचाल २२ जानेवारीनंतर आणखी वेगाने आणि दृढतेने राम राज्याच्या दिशेने सुरू होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
‘सृजन संपदा’च्या वतीने ठाण्यातील गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. रामराज्यात जो वंचित, पीडित, शोषित असेल त्याचा आवाज ऐकला जाईल. त्याला न्याय मिळेल. प्रत्येक शेवटच्या व्यक्तीला या राज्यात प्रथम स्थान मिळेल. नरेंद्र मोदी हे नवभारताची निर्मिती करत आहेत. या नवभारताच्या निर्मितीला २२ जानेवारीला नवी अस्मिता प्राप्त होत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >>> ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडूनही श्रीरामाची मिरवणूक
यावेळी माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे प्रवक्ते सुजय पतकी, ‘सृजन संपदा’च्या अध्यक्षा नयना सहस्रबुद्धे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित होते. ‘‘बाबरी ही कधीच मशीद नव्हती. मीर बाकीने देखील या ठिकाणी कधीच नमाज अदा केली नव्हती. बाबरीचा ढाचा कलंकाचा, गुलामीचा होता. तो कारसेवकांनी तोडून त्या ठिकाणी राम मंदिराची स्थापना केली. आता तेथे भव्य मंदिर उभे राहत आहे. गुलामगिरीच्या जेवढया निशाण्या आहेत तेवढया संपवायच्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यामुळे गुलामगिरीची अंतिम निशाणी आता आपण संपवत आहोत. नवभारताची नव अस्मिता २२ जानेवारीला प्राप्त होत आहे’’, असे फडणवीस यांनी नमूद केले.
काही जण हा निर्णय न्यायालयाचा आहे असे म्हणत आहेत. परंतु त्यांनीच २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात राम काल्पनिक असल्याचे म्हटले होते. मंदिर उभे राहू नये यासाठी त्यांनी व्यवस्था उभी केली होती, असा आरोप फडणवीस यांनी विरोधकांवर केला.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात आज महाआरती, राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूकदेखील काढली जाणार
‘ठाणे आणि राम यांचे नाते’
डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात ठाणे आणि रामाचे नाते उलगडून दाखवले. ते म्हणाले, ‘‘नाशिकहून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बाणगंगेला गेले होते. त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यातून गेले असतील. त्याचप्रमाणे ठाणे आणि ‘रामा’चे आणखी एक वेगळे नातेही आहे. लोकशाहीप्रेमींना कारावासात पाठवले गेले त्या कालखंडाचा समारोप ज्यांच्या विजयामुळे झाला ते रामभाऊ म्हाळगी. त्यानंतर बरीच वर्षे राम कापसे यांनीही लोकसभेत ठाण्याचे प्रतिनिधित्त्व केले.’’ ठाण्याची ही ‘राम परंपरा’ कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘श्रीरामांप्रमाणे मोदींकडून दुर्जनांचा नायनाट’ त्या काळात राक्षस सज्जन शक्तींना त्रास देत होते. त्यामुळे प्रभू श्रीरामांना ऋषींनी बोलावून घेतले होते. त्यांनी राक्षसांचा नायनाट केला आणि सज्जनशक्तींना वाचवले. दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात ही प्रभू श्रीरामांनी केली. आजच्या भारतात दुर्जन शक्ती आहेत. त्या दहशतवाद माजवत आहेत. त्यांचा नायनाट नरेंद्र मोदी करत आहेत असेही फडणवीस म्हणाले.