डोंबिवली – शिलाहार राजेशाहीच्या काळात महाराष्ट्र प्रांतात सर्वाधिक शिलालेख, ताम्रपटांचे लेखन झाले. या ऐतिहासिक शिलालेख आणि ताम्रपटांच्या माध्यमातून इसवी सन काळापासून होत असलेली सूर्यग्रहणे आणि चंद्रग्रहणे यांची माहिती मिळते. महाराष्ट्र, गोवा भागात एकूण ७२६ शिलालेख आणि ताम्रपट आहेत. या शिलालेखांवरील वर्णनावरून रविवार, ता. ७ सप्टेंबर (भाद्रपद) रोजी रात्री ९.५७ वाजता लागणारे चंद्रग्रहण हे तब्बल ८७५ वर्षांनी पुन्हा यापूर्वीच्या तारखेला एक दिवसाच्या अंतराने होत आहे, अशी माहिती कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी काही ऐतिहासिक संदर्भाच्या माध्यमातून दिली आहे.
रविवार, आज ९ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण रात्री ९.५७ वाजता लागणार आहे आणि ते रात्री १.२७ वाजता सुटणार आहे. या खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श रात्री ९.५७, सम्मीलन रात्री ११ वाजता, ग्रहण मध्य रात्री ११.४२ वाजता, ग्रहण उन्मीलन रात्री १२.२३ आणि ग्रहण मोक्ष (सुटणे) रात्री १.२७ वाजता होणार आहे. या ग्रहणाचा पर्वकाल तीन तास ३० मिनिटे असणार आहे, असे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले.
इसवी सन काळापासून जी सूर्यग्रहणे आणि चंद्रग्रहणे झाली त्यांची माहिती आपणास महाराष्ट्र, गोवा राज्यातील विविध भागात असलेल्या शिलालेख आणि ताम्रपटातून मिळते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात एकूण ७२६ शिलालेख आणि ताम्रपट आहेत. या शिलालेख आणि ताम्रपटांच्या माध्यमातून इसवी सनाच्या काळात झालेली १९ सूर्यग्रहणे आणि १७ चंद्र ग्रहणे यांची माहिती मिळते. ग्रहणांची माहिती मिळण्यासाठी इतर दस्तऐवजांबरोबर शिलालेख, ताम्रपट हे सबळ पुरावे आहेत. यापूर्वीची दोन चंद्रग्रहणे ही भाद्रपदामध्ये झालेली आहेत असे विविध भागातील शिलालेखावरून स्पष्ट झाले आहे, असे डाॅ. साठे यांनी सांगितले.
कोल्हापुरचा शिलालेख
रविवार, ७ सप्टेंबर रोजी होणारे रात्रीच्या वेळेतील खग्रास चंद्रग्रहण तब्बल ८७५ वर्षांनी यापूर्वीच्या तारखेच्या एक दिवस अगोदर भाद्रपद महिन्यात होत आहे. ग्रहण सुटण्याचा काळ विचारात घेतला तर ८७५ वर्षांनी ज्या दिवशी चंद्रग्रहण होते त्याच दिवशी रविवार, ७ सप्टेंबरचे चंद्रग्रहण आले आहे. ८७५ वर्षापूर्वींनी भाद्रपद महिन्यात होणाऱ्या चंद्रग्रहणाची माहिती देताना डाॅ. श्रीनिवास साठे यांनी जुने शिलालेखाचे संदर्भ देऊन सांगितले, की महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बामणी गावाजवळ नैऋत्य दिशेला जैन मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ एका शिळेवर शिलाहार काळातील महामंडलेश्वर राजा विजयादित्य यांच्या कारकिर्दीतील एक शिलालेख आहे.
या शिलालेखावर शके १०७३, भाद्रपद पौर्णिमा, चंद्रग्रहण, प्रमोद सवंत्सर, शुक्रवार, ८ सप्टेंंबर ११५० या कालावधीत झालेल्या चंद्रग्रहणाची माहिती दिली आहे. हा शिलालेख संस्कृत, प्राचीन कानडी लिपित आहे. इसवी सन ११५० मध्ये भाद्रपद महिन्यात झालेल्या चंद्रग्रहणाचा विचार केला तर रविवार, ७ सप्टेंबर रोजी भाद्रपदात होणारे चंद्रग्रहण तब्बल ८७५ वर्षांनी होत आहे, असे डाॅ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले.
अशाच प्रकारे भाद्रपदात झालेल्या चंद्रग्रहणाचा उल्लेख अकोला तालुक्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सीसवे ताम्रपटात आहे. हा ताम्रपट सिरसोच्या एका मुसलमानाजवळ मिळाला. तो नागपूरच्या सेंट्रल म्युझियममध्ये आहे. संस्कृत भाषेतील हा ताम्रपट राष्ट्रकुट राजा गोविंद (तिसरा) याच्या काळात कोरला आहे. या ताम्रपटावर भाद्रपद पौर्णिमा व्यय संवत्सर, शके ७२९, शनिवार २१ ऑगस्ट ८०७ मध्ये झालेल्या च्ंद्रग्रहणाचा उल्लेख आहे.
कोल्हापूर बामणी येथील शिलालेखात राजा विजयादित्यची वंशावळ दिली आहे. हा शिलालेख अभिनंददेव यांचा शिष्य व सुवर्णकार बम्योज यांचा पुत्र गोव्योज याने कोरलेला आहे, असे डाॅ. साठे यांनी सांगितले.
इतिहासकालीन बहुतांशी शिलालेख, ताम्रपट हे शिलाहार राजांच्या काळात दिसतात. त्यानंतर कागद, मुद्रणे आली त्यानंतर शिलालेख, ताम्रपटाचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर राजेशाहींमध्ये दानपत्र, कागदपत्रांचा वाढला. नंतरच्या काळात ताम्रपट, शिलालेखांचे प्रमाण कमी दिसते. शिलालेख, ताम्रपट हे इतिहासाचे भक्कम संदर्भ आहेत. – डाॅ. श्रीनिवास साठे, इतिहासाचे अभ्यासक.