बदलापूर : बदलापूर शहरात प्रथमच एक अत्यंत दुर्मिळ आणि आकर्षक रंगसंगती असलेला मलबार पिट वायपर (Malabar Pit Viper) हा विषारी साप आढळून आला आहे. आदर्श विद्यामंदिर शाळेच्या बाहेर पदपथावर नागरिकांना सर्प दिसल्याची माहिती मिळताच स्केल्स अँड टेल्स कॉन्सर्वेशन संस्थेचे सर्पमित्र विकास आढाव आणि रतिश कारेकर यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ सापाला सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
पकडण्यात आलेला साप बदलापूर वनविभाग कार्यालयात वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या ताब्यात देण्यात आला. तपासानंतर त्यांनी स्पष्ट केले की हा साप मलबार चापडा (Malabar Pit Viper) या प्रजातीचा असून हा साप अत्यंत दुर्मिळ आणि विषारी प्रकारात मोडतो. या प्रजातीचे नैसर्गिक वास्तव्य महाराष्ट्रात प्रामुख्याने आंबोली घाट परिसरातील थंड, ओलसर आणि दाट जंगलांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
वनाधिकारी वाळिंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरात हा साप कसा आला याचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ज्या ठिकाणी हा साप आढळला तेथे गोवा आणि सिंधुदुर्ग परिसरातून येणाऱ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसचा थांबा असल्याने, हा साप अशाच एखाद्या वाहनासोबत इथे पोहोचल्याची शक्यता आहे.
या सापाच्या बचाव आणि संवर्धन मोहिमेत वनविभाग आणि सर्पमित्रांनी समन्वय साधून कार्य केले. उपवनसंरक्षक, ठाणे सचिन रेपाळ यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक वनसंरक्षक भाग्यश्री पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, या दुर्मिळ सापास त्याच्या मूळ अधिवास असलेल्या आंबोली घाट परिसरात सुखरूपपणे सोडण्यात आले आहे.
या मोहिमेत सर्पमित्र संकेत कर्णिक, हर्षद झाडे तसेच वनरक्षक दिपक बेनके यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नांचे वनविभागाने विशेष कौतुक केले आहे. साप अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यास न मारण्याचे आणि सर्पदर्शन झाल्यास तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी नागरिकांना केले.
मलबार पिट वायपरची वैशिष्ट्ये
मलबार चापडा हा २ ते ३ फूट लांबीचा, आकर्षक हिरवट, तपकिरी आणि पिवळसर रंगसंगतीचा साप असून तो निशाचर म्हणजे रात्री सक्रिय राहणारा आहे. या प्रजातीचा साप ठाणे जिल्ह्यात प्रथमच आढळून आल्याने यास वनविभागाने विशेष महत्त्व दिले आहे. महाराष्ट्रात याआधी या सापाची उपस्थिती प्रामुख्याने आंबोली घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागातच नोंदली गेली होती.
बदलापूर परिसरात आढळलेला मलबार पिट वायपर हा ठाणे जिल्ह्यातील पहिला नोंदवलेला नमुना आहे. हा साप विषारी असला तरी तो सहसा मानवावर हल्ला करत नाही. नागरिकांनी अशा घटनांमध्ये सर्पमित्रांची मदत घ्यावी आणि वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव वाळिंबे यांनी केले आहे.