कल्याण : कल्याण पूर्व भागात राजकीय दबदबा असलेल्या माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी गणपती दर्शनाचे निमित्त साधून माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. काही दिवसापूर्वीच महेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. भाजप प्रदेशाध्यांनी गायकवाड यांची त्यांच्या घरी येऊन भेट घेतल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
कल्याण पूर्वेचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात जमीन वादातून शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर दोन वर्षापूर्वी गोळीबार केल्याच्या घटनेपासून कल्याण पूर्वेत भाजप आणि महेश गायकवाड यांच्यात दुहीचे वातावरण आहे. महेश गायकवाड शिंदे शिवसेनेतील कल्याण पूर्वेचे शिलेदार म्हणून ओळखले जात होते. युती म्हणून ते कल्याण पूर्वेत शिवसेना, भाजपच्या कार्यक्रमात असायचे. पण, भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यापासून महेश गायकवाड यांनी भाजपपासून दूर राहण्याची भूमिका घेतली.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाड यांचे घर सोडून कोणालाही उमेदवारी द्या, आपण त्या उमेदवाराचे काम करू, अशी ठाम भूमिका विधानसभा निवडणूक काळात गेल्या वर्षी महेश गायकवाड यांनी घेतली होती. भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. सुलभा गायकवाड या शिंदे शिवसेना, भाजप, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष महायुतीच्या उमेदवार होत्या.
सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच, महेश गायकवाड अस्वस्थ झाले. त्यांनी ईर्षेवर सुलभा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली. महायुतीच्या उमेदवारा विरूध्द निवडणूक लढवितो म्हणून शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महेश गायकवाड यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. महेश यांनी स्वसामर्थ्याने आणि पडद्यामागून काही राजकीय शक्तींची मदत घेऊन तुल्यबळाने सुलभा गायकवाड यांच्या विरूध्द निवडणूक लढविली. सुलभा गायकवाड विजयी झाल्या, पण आपणही त्यांच्या विरुध्द तुल्यबळाने निवडणूक लढवून दाखविली असाही संदेश महेश यांनी लोकांना दिला.
या राजकीय हालचालींमुळे भाजप आणि महेश गायकवाड यांच्यात वितुष्ट होते. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणपती दर्शनाचे निमित्त साधून कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड काय म्हणतील याचा विचार न करता महेश गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या दर्शन राजनितीमधून महेश आणि भाजपमधील दरी दूर करण्याचा प्रयत्न आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर कमी करण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला असल्याचे समजते.
ही सदिच्छा भेट होती यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे गायकवाड समर्थकांनी सांंगितले. तर, भाजप प्रदेशाध्याक्षांनी गोंधळ (कन्फ्युजन), संभ्रम (क्लॅश) आणि राजकीय जोडणी (कनेक्ट) या ‘थ्री सी’ सुत्राचा अवलंंब करून गणपती दर्शन कल्याण, डोंबिवलीत सुरू केले आहे. आणि राजकीय वैर दूर सारून सर्वांना मैत्रीचे अवताण देण्यास सुरूवात केली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.