लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कल्याण शीळ मार्गावरील शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित तीन मार्गिका नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. तर नुकतीच या पुलाची दुसरी बाजू देखील वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलामुळे शिळफाटा चौकातला प्रवास वेगवान झाला आहे. तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला असल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहापदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शिळफाटा जंक्शन येथे सहा पदरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांचे आनंद दिघेंबाबत मोठे वक्तव्य, “रुग्णालयात असताना पद सोडायला सांगितल्याने दिघे बैचेन होते…”

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीच्या माध्यमातून या पुलाची उभारणी केली आहे. या उड्डाणपुलाची तीन मार्गिका असलेली एक बाजू फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण करून सुरु केली होती. यामुळे पनवेल कडे जाणाऱ्या वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला होता. तर या पुलाची तीन मार्गिका असलेली दुसरी बाजू देखील नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या वेळेमध्ये आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

शीळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

  • एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची उभारणी
  • ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद