लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत होती. यामुळेच त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता आणि रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आला होता. यामुळे दिघे बैचेन होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच धर्मवीर चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखविल्या नव्हत्या. परंतु आता पुढच्या भागात सगळे खरे दाखविणार, असेही ते म्हणाले.
ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवार, टीप टॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आनंद दिघेंना मातोश्रीने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. ठाणे आणि पालघर जिल्हा हा एकच होता. त्याचे नेतृत्व आनंद दिघे हे करत होते. त्यांना मातोश्रीने पद आणि जिल्हा सोडायला सांगितले होते. परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर, आपल्यासोबत एकही माणूस राहणार नाही, असे अनेकांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला, असा असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
आणखी वाचा-कपिल पाटलांच्या विजयासाठी कथोरेंचे विशेष मनोगत, घरोघरी पोहोचवलेल्या प्रचार पत्रावर कथोरेंचे आवाहन
दिघे हे फकीर माणूस होते, दोन्ही हाताने वाटणारे होते आणि शाखेत राहत होते. पण दिघे यांच्या निधनानंतर मला त्यांची मालमत्ता विचारली. तेव्हाच आपण चुकीच्या ठिकाणी आल्याची मला जाणीव झाली. परंतु नाईलाजाने काम करत होतो, असेही ते म्हणाले. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत होती. यामुळेच त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता आणि रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आला होता. यामुळे दिघे बैचेन होते, असे सांगितले.
माझ्या बाबतीत वाईट घटना घडल्यानंतर आनंदी यांनी मला सभागृहनेता पद देतो असे सांगितले. परंतु मी घटनेमुळे खचलेला असल्याने ही जबाबदारी पार पाडू शकणार नाही असे त्यांना सांगितलं होतं परंतु ते माझ्यासाठी दैवत होते. त्यामुळे त्यांचा आग्रह मी नाकारू शकलो नव्हतो. राजन विचारे यांनी सभागृहनिता पदाचा राजीनामा सहजा सहजी दिला नव्हता आणि राजीनामा देताना त्यांनी दिघे यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. त्यामुळे धर्मवीर सिनेमांमध्ये जे काय दाखवलं ते खूप चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले होते. मात्र ते काही खरे नसून सिनेमाच्या पुढच्या भागात सर्व काही खरे दाखवू, असेही ते म्हणाले.