ठाणे – घोडबंदर मुख्य व सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाविरोधात येथील रहिवाशी एकवटले असून रविवारी सायंकाळी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रहिवाशांनी प्रकल्पाविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी कोंडी वाढेल आणि अपघातांची शक्यता अधिक वाढेल, असे सांगत त्यांनी प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह यावेळी धरला.

पालिकेने महामार्गालगत परवानगी दिलेल्या इमारतींमधील आस्थापनांच्या व्यवसायावरही या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, या प्रकल्पावर खर्च करण्याऐवजी तोच निधी वापरून रस्त्यांवरची दुरुस्ती करा, अशी सूचना भाजप आमदार संजय केळकर यांनी यावेळी केली.

घोडबंदर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, सुरुवातीपासूनच नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तरीही काम सुरू असल्याचे दिसत असून, आता महामार्गालगतच्या दहा गृहसंकुलांच्या असोसिएशनने या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला आहे. या रहिवाशांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर केळकर यांनी रविवारी सायंकाळी हिरानंदानी पार्क येथील सभागृहात रहिवाशी आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.

या बैठकीला भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुम्बरे यांच्यासह मानपाडा ते भाईंदर पाडा भागातील संकुलांमधील रहिवाशी उपस्थित होते. या बैठकीत घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल रहिवाशांनी मते व्यक्त करत एकप्रकारे प्रकल्पाविरोधात आक्रोश व्यक्त केला. तर, मेट्रो प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यावर वाहतूक कमी होईल.

तसेच उन्नत मार्ग, खाडीकिनारी मार्ग यामुळे येत्या काळात अवजड वाहनांचाही भार कमी होणार असल्याने मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाच्या निधी रस्ते दुरुस्तीसाठी वापरा, अशा सुचना आमदार केळकर यांनी यावेळी केल्या. या प्रश्नावर आपण रहिवाशांच्या पाठीशी आहोत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यात येईल, असे आश्वासन आमदार केळकर यांनी यावेळी रहिवाशांना दिले.

काय आहे प्रकल्प

घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी करण्यात येत आहे. यात कापुरबावडी ते गायमुख पर्यंत १०. ५० किमी अंतरापर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता एकमेकांना जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे आग्रही होते. घोडबंदर भागाची वाहतुक कोंडी कमी व्हावी यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामामध्ये तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित झाले आहेत. शिवाय याठिकाणी महावितरणचे पेट्या, विद्युत खांब आणि उच्च दाबाची वाहीनी स्थलांतरीत करण्यासाठी ६९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नागरिकांचे म्हणणे

या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गालगत असलेल्या अनेक संकुलांना अनेक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. नागरिक आणि शालेय मुलांना वळसा घालून प्रवास करावा लागणार असल्याने त्यांचे हाल होणार आहेत. या प्रकल्पामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येण्याबरोबरच अपघात वाढतील. अनेक रुग्णालये महामार्गालगत असून या रुग्णवाहिकांनाही वळसा घालून प्रवास करावा लागेल. एकूण नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत असल्याने प्रकल्पांचा पुनर्विचार करावा अशी आमची मागणी आहे, असे स्थानिक रहिवाशी विद्याधर पत्की यांनी दिली.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी घोडबंदरचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडला जात आहे. पण, हा हेतू कधीच सफल होणार नाही. उलट कोंडी वाढण्याची चिन्हे आहेत. संकुलाच्या प्रवेशद्वारासमोरूनच महामार्ग जाणार असल्याने नागरिकांना संकुलांतून वाहतूक करणे शक्य होणार असून यामुळे अपघात होण्याची भिती आहे. वृक्ष तोडून पालिकेने पर्यावरणविरोधी काम केले आहे. ठाणे महापालिकेने सेवा रस्ता दाखवून महामार्गालगत इमारतींना परवानगी दिली असून त्याचे नियमाचा भंग होत आहे, असे स्थानिक रहिवाशी राजेश पावडे यांनी सांगितले.

प्रकल्पाचा पुनर्विचार करावा

सेवा रस्ता जोडण्याच्या अट्टाहासामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा, सुविधेचा प्रश्न उपस्थित होणार असून सेवा रस्ता अतिक्रमणापासून मुक्त करण्याऐवजी तो मुख्य रस्त्याला जोडण्याला विरोध आहे. शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असून याबदद लोकांनी संताप व्यक्त केला. कायदेशीर दृष्ट्या एमएमआरडीएने नागरिकांच्या सुचना, आक्षेप मागविल्या नाहीत आणि त्याविनाच निर्णय घेतला. सेवा रस्त्यावरील शाळा, दुकान, इमारतींना पालिकेने ज्या अटीवर परवानगी दिली होती, त्याचा भंग होत आहे. ज्यांच्याकरिता हा घाट घातला जातोय, त्यांची सुरक्षा, सुविधा धोक्यात येण्याबरोबरत अपघात वाढणार असतील तर, या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी सुचना आमदार केळकर यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली.