डोंबिवली – डोंंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीतील रिजन्सी अनंतम गृहसंकुलाच्या आतील भागातील प्रवेशव्दारांवर रिक्षा चालकांची अरेरावी सुरू आहे. ही अरेरावी दररोज या गृहसंकुलातील रहिवासी सहन करतात. या संकुलातून डोंबिवली शहर परिसरात जाणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, पालकांनाही या अरेरावीचा फटका बसत आहे. रिजन्सी अनंतम गृहसंकुलाच्या आतील भागात प्रवेश करून सोसायट्यांच्या प्रवेशव्दारावर हे रिक्षा चालक वतनदारी करत असल्याने त्यांचा बंदोबस्त कसा करावा या विवंचनेत रहिवासी आहेत.

सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील एक विद्यार्थी डोंबिवली शहरातील शाळेत जाण्यास उशीर झाला म्हणून आपल्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर उभ्या असलेल्या रिक्षा चालकांना ‘काका, मला शाळेत जाण्यास उशीर झाला आहे. तर, मला तात्काळ शाळेत सोडा ना,’ अशी विनंती करत होता. रिजन्सी अनंतम गृहसंकुलाच्या आतील भागातील इमारतींच्या प्रवेशव्दारावर यावेळी भली मोठी रिक्षेची रांग होती. आपणास सहज रिक्षा मिळेल असे या मुलाला वाटत होते.

रांगेतील प्रत्येक रिक्षा चालकाजवळ जाऊन विद्यार्थी मला शाळेत जाण्यास उशीर होतोय, सोडा ना शाळेत लवकर असे गयावया करून सांगत होता. प्रत्येक रिक्षा चालक शाळकरी मुलाला शाळेपर्यंत जाण्यासाठी ७० रूपये भाडे होईल, असे सांगून रांगेतील अन्य रिक्षा चालकाकडे जाण्यास सांगत होता. अशाप्रकारे चार ते पाच रिक्षा चालकांना विद्यार्थ्याने शाळेत सोडण्यासाठी आर्जव केले. चालकांनी त्यास नकार दिला.

मुलाला शाळेत जाण्यास उशीर होत आहे हे माहिती असुनही रांगेतील रिक्षा चालक त्या मुलाला वाढीव भांडे सागून त्याची कोंडी करत होते. मुलगा एक सोडून दुसऱ्या रिक्षा चालकाकडे गेला की मग रिक्षा चालक त्या शाळकरी मुलाकडे पाहून त्याची कुचेष्टा करत होते. हा सगळा प्रकार आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी रिजन्सी अनंतम इमारतीच्या प्रवेशव्दारावर उभा असलेला एक पालक पाहत होता.

एक शाळकरी मुलगा आपणास विनंती करतोय, त्याच्याकडील भाड्याचा विचार न करता त्याला शाळेत सोडावे म्हणून एकाही रिक्षा चालकाला त्याची दया आली नाही. या रिक्षा चालकांना याविषयी बोलले तर ते एकत्रितपणे आपणास अरेरावी करतील या विचाराने हा प्रकार पाहणाऱ्या पालकाने शांत राहणे पसंत केले.

मुलाकडे भाड्यासाठी आवश्यक तेवढेच पैसे असतील. त्यामुळे तो रिक्षेसाठी ७० रूपये भाडे देऊ शकत नव्हता. चार ते पाच रिक्षा चालकांना विचारणा करूनही एकही रिक्षा चालक तयार झाला नाही म्हणून अखेर हिरमुसलेला मुलगा पु्न्हा रिजन्सी अनंतममधील इमारत क्रमांक सतराच्या दिशेने आपल्या घराच्या दिशेने आज आपली शाळेत गैरहजेरी लागली या विचाराने निघून गेला.

रिजन्सी अनंतम गृहसंकुलाच्या आतील भागातील इमारतींच्या प्रवेशद्वारावर ही आपलीच जागा आहे अशा अविर्भावात रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत आहेत. रहिवासी, नोकरदार, विद्यार्थी, पालक यांना या रिक्षा चालकांमुळे सोयीपेक्षा त्रासच अधिक होत आहे. त्यामुळे आरटीओ, वाहतूक अधिकारी यांनी या मुजोर रिक्षा चालकांचा बंदोबस्त करावा. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.