Manoj Jarange Patil Azad Maidan Mumbai Protest Travel Guidelines ठाणे – मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. अशातच नवी मुंबईतूनही अनेकजण या उपोषणात सहभागी होत आहेत. याच मराठी बांधवांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने काही सूचना जाहिर करण्यात आल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत येत आहेत. या बांधवांसाठी राज्यभरातून जेवणाी सोय केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मराठा समाज स्थायिक आहे. या उपोषणास अनेक मराठा बांधव देखील उपस्थित राहत आहेत. हे सर्व बांधव रेल्वे गाडीने प्रवास करणे पसंत करित आहेत.

दरम्यान अनेक मराठा बांधव रेल्वेने प्रवास करित असल्याने त्यांच्यासाठी मराठा समाजाच्यावतीने काही सुचना देण्यात आल्या आहेत. अशातच, पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले असून, बाहेरगावी गेलेले आणि सुट्टीवर असलेला नोकरदार वर्ग आज, सोमवारी पुन्हा कर्तव्यावर आलेला आहे. त्यामुळे मुंबईतील सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही अधिक असणार आहे. तसेच उपोषणासाठी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या मराठा बांधव देखील मोठ्या संख्येने आहेत.

अशातच प्रवास करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी “नवी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मध्ये मराठा वर्ग आणि नेहमीचा रेल्वे प्रवासी या दोन्ही गोष्टींच्या सोयीचा विचार करून सुचना देण्यात आल्या आहेत.

नेमक्या सुचना काय ? मराठा बांधवांसाठी दिलेल्या सुचनांमध्ये पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे कोणीही रेल्वे ट्रॅकवर खाली उतरू नये. त्याचबरोबर ट्रेनमध्ये बाहेर लटकून प्रवास करणे टाळावे. तर, तिसरी महत्त्वाची सूचना म्हणजे, नवी मुंबई परिसरातील नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने सकाळी आणि सायंकाळी प्रवास करतो. त्यामुळे सकाळी साधारणत: ५ ते ८ या वेळेत प्रवास टाळावा. आवश्यक असल्यास सकाळी १० नंतर प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी रात्री ८ ते ९ नंतरचा वेळ सोयीस्कर मानावा, कारण या वेळेत बहुतांश नोकरदार घरी पोहोचलेले असतात. अशा सुचना मराठा बांधवांसाठी देण्यात आल्या आहेत.