कल्याण : कल्याण पूर्वेतील काही बँकांच्या एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा केल्यानंतर या एटीएममधील अगोदरची शिल्लक रोख रक्कम ठेव सुरक्षा कार्यालयात जमा करायची असते. पण एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी असलेल्या वाहनावरील चालक, सुरक्षा रक्षक रोखपाल यांनी संगनमत करून ७० लाख ५४ हजार रूपयांच्या रकमेतील सहा लाख १८ हजार रूपये कार्यालयात भरणा केले नाहीत. या रकमेविषयी या कर्मचाऱ्यांनी कोणतेही सबळ कारण सुरक्षा कंपनीला दिले नाही. त्यामुळे त्यांनी रकमेचा अपहार केला असल्याचा ठपका सुरक्षा कंपनीच्या व्यवस्थापकाने ठेवला आहे.

या अपहारण आणि लूटप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोखपाल प्रदीप विश्वनाथ यादव (३२, रा. यादवनगर, ऐरोली, नवी मुंबई), नितीन दत्ताराम अहिरे (३५, रा. डोंबिवली), सुरक्षा रक्षक योगेश नामदेव कदम ९२५, रा. वागळे इस्टेट, ठाणे), राकेश विनायक चव्हाण (रा. विटावा, ठाणे) अशी गुन्हा दाखल कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक हिमांशु रोशनलाल जैन (३३) यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. कल्याण पूर्वेतील मलंग रस्ता भागातील यशराज इमारतीमधील एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे.

व्यवस्थापक हिमांशु जैन यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आमची सिक्युरिटी एजन्सी विविध बँकांमधून रोख रक्कम स्वीकारते. ही रक्कम बँकेने प्रस्तावित केलेल्या शहराच्या विविध भागातील एटीएममध्ये भरणा करते. कोट्यवधीची ही रक्कम असल्याने सुरक्षा म्हणून या सुरक्षा वाहनात रोखपाल, दोन सुरक्षा रक्षक, चालक असा ताफा असतो. मी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता आमच्या रोख रक्कम वितरण करणाऱ्या बंदिस्त सुरक्षा वाहनात विविध बँकांमधून स्वीकारलेली आणि ती त्या बँकांच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठीची रक्कम चालक, रोखपाल, सुरक्षा रक्षक या गुन्हा दाखल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिली. तीन कोटी २४ लाख रूपयांची ही रक्कम होती.

ही रक्कम कल्याण पूर्वेतील ॲक्सिस एटीएम, एचडीएफसी एटीएम आणि बँक ऑफ बडोदा बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी देण्यात आली होती. या एटीएममध्ये नव्याने पैसा भरणा करण्यापूर्वी या एटीएममधील यापूर्वीची जुनी रक्कम काढून घेऊन ती स्वतंत्र ठेवायची असते. ती रक्कम नंतर सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून पुन्हा बँकेच्या स्वाधीन केली जाते. गुन्हा दाखल कर्मचाऱ्यांनी विविध बँकांच्या एटीएममध्ये नव्याने रक्कम भरणा केली आणि जुनी रक्कम काढून स्वताच्या ताब्यात घेतली.

ही ताब्यातील रक्कम ७० लाख ५४ हजार १०० रूपये होती. ही रक्कम जशीच्या तशी गुन्हा दाखल कर्मचाऱ्यांनी सुरक्षा एजन्सीच्या ताब्यात देणे आवश्यक होते. त्याऐवजी या कर्मचाऱ्यांनी ६४ लाख ३५ हजार २०० रूपयांचा भरणा सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात भरणा केला. उर्वरित सहा लाख १८ हजार ९०० रूपयांची रक्कम कोठे गेली, अशी विचारणा या वाहनावरील कर्मचाऱ्यांना करण्यात आली. त्यांनी सबळ कारणे दिली नाहीत. त्यामुळे .या रकमेचा त्यांनी अपहार केल्याचा ठपका ठेवत सुरक्षा एजन्सीने कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.