Aapla Dawakhana, Thane News : ठाणे : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आपला दवाखाना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिका प्रशासनाने सुरू केला होता. मात्र, ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आपला दवाखाना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिका प्रशासनाने सुरू केला होता. मात्र, ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला आहे. बंद पडलेल्या दवाखान्यांच्या जागी आता अनेक ठिकाणी इतर व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून येत असून एके ठिकाणी तर साड्यांचे दुकान सुरू झाले आहे, असा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी ५२ टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळीमध्ये राहत आहेत. आरोग्य निकषांनुसार प्रत्येक ३० ते ४० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक असताना ठाण्यात एक ते दीड लाख लोकसंख्येचा भार एका आरोग्य केंद्रावर पडतो. ठाण्यातील विद्यमान २७ आरोग्य केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात ५० ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अशा नामकरणाने सुरू झालेल्या या दवाखान्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या ‘मेडऑनगोस आपला दवाखाना’ संस्थेला प्रत्येक रुग्णामागे दीडशे रुपये देण्यात येत होते. मात्र, ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून याकडे भाजप आमदार संजय केळकर यांनी लक्ष वेधले आहे.
पगार मिळवून देण्याची मागणी
खोपट येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शुक्रवारी विविध समस्या घेऊन अनेक नागरिकांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले. बिल्डरांकडून रहिवाशांची झालेली फसवणूक, वारसा हक्क प्रकरणे, पाणी टंचाई, महापालिकेबाबत तक्रारी, आरोग्य, शिक्षण अशा विषयांचा यात समावेश होता. त्याचबरोबर आपला दवाखान्यातील कर्मचारी आणि परिचारिकांनाही निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या. ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू केलेल्या आपला दवाखाना बंद झाला असून बेरोजगार झालेल्या कर्मचारी आणि परिचारिकांचा सहा सहा महिन्यांचा पगार देखील थकला आहे. या कर्मचाऱ्यांनी पगार मिळवून देण्याची मागणीसाठी केळकर यांच्याकडे केली.
अन्यथा महापालिकेवर धडक मोर्चा
आपला दवाखाना हा उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने बंगळुरु येथील मेडऑनगोस नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले. तत्पूर्वी मागील सहा सहा महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली. या कंपनीला ५६ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी महापालिकेला दाद देत नाही. त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केळकर यांनी केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बंद दवाखान्याच्या जागी इतर व्यवसाय सुरू
एखादा उपक्रम सुरू करायचा, तो बंद पडला की दुसरा उपक्रम सुरू करायचा. महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही. लोकांना थातुर मातुर सेवा देणारी यंत्रणा नको, सक्षम आरोग्यसेवा देणारी यंत्रणा महापालिकेने उभी करायला हवी, असे मतही केळकर यांनी मांडले. ‘बंद पडलेल्या दवाखान्यांच्या जागी आता अनेक ठिकाणी इतर व्यवसाय सुरू झाल्याचे दिसत असून एके ठिकाणी तर साड्यांचे दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे या जागा देखील गिळंकृत होण्याची भीती व्यक्त होत आहे, असे केळकर म्हणाले.
