बीड – परळीत शरद पवार यांना मानणारा वर्ग असून परळीतून निवडून येणारा नगराध्यक्ष आमचाच असेल,असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. काँग्रेसने स्वतंत्र अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘परळीत माझे पूर्ण लक्ष असणार आहे. आमच्या राष्ट्रवादीत सगळं व्यवस्थित सुरू आहे असे सांगत बीड मधील सहाही नगरपरिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढत असल्याचे खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पत्नी संध्या दीपक देशमुख या परळी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले होते. रविवारी रात्री खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत पत्रकार परिषद घेत त्यांच्या नावाची घोषणा केली. परळीत शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून परळीचा येणारा नगराध्यक्ष आमचाच असेल,असा ठाम विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने स्वतंत्र अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.परळी नगरपालिकेत गेल्या काळात झालेला भ्रष्टाचार, शहरातील वाढती दादागिरी या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढणार असल्याचे सोनवणे सोनवणे यावेळी म्हणाले. परळी मुंडे यांची अशी प्रतिमा असली तरी त्यावर आता शरद पवार गटाने दावा सांगितला आहे.
धनंजय मुंडे, पंकजा मंडे या बंधू भगिनीच्या तयारीला उत्तर देण्यासाठी बजरंग सोनवणेही सरावले असल्याचे चित्र आहे. या वेळी नगरसेवक पदासाठी दीपक देशमुख व वैजनाथ ढमपलवार, सय्यद हसीना जब्बार यांच्या नावाची घोषणा सोनवणे यांच्याकडून करण्यात आली.या पत्रकार परिषदेवेळी राज्य सरचिटणीस राजेभाऊ फड, निरीक्षक डॉ. नरेंद्र काळे,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, शहराध्यक्ष ॲड.जीवन देशमुख,तालुकाध्यक्ष बाबा शिंदे हे यांची उपस्थिती होती.
केवळ परळीच नाही तर जिल्ह्यातही शरद पवार यांच्या पाठिशी जनता नेहमी उभी राहते, त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुका अधिक गंभीरपणे लढण्यासाठी रणनीती आखली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीतील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले होते. विशेषत: राख उकरण्याचा अवैध उद्योगावरही मोठी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसकडून परळीतील प्रचार मुद्द्यांभोवती वाल्मिक कराड याचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.
