ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्याविरोधात एक खरमरीत पत्र लिहीले. तसेच, दावा केला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून म्हस्के हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. हे पत्र सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. दरम्यान, शुक्रवारी (आज) राजन विचारे यांचा वाढदिवस आहे. नरेश म्हस्के यांच्याकडून विचारे यांच्याविरोधात थेट प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांनी राजन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पत्रास उत्तर देईन पण…असे म्हणत एक इशारा दिला आहे.

राजन विचारे यांनी त्यांच्या पत्रामध्ये नरेश म्हस्के यांच्यावर थेट टीका केली होती. राजन विचारे यांनी म्हस्के यांना म्हटले की वाचाळवीर हीच उपाधी तुम्हाला योग्य आहे. आमच्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेल्याचे टीका करतो, पण एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून तू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होतास हे आठवते का? आणि तेव्हा याच राजन विचारेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तुला शिवसेनेत परत आणले याचा विसर पडू देऊ नकोस. कोरोना काळात उंदरासारखा घरातल्या बिळात लपलेला तू, ठाण्यातील मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडला होतास. गद्दारी नसानसामध्ये भिनलेल्या तुझ्यासारख्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठव, म्हणजे तुला कळेल, गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण ते?

देशप्रेम मला काय शिकवतो, मुंबई मधील २६ / ११ च्या हल्यानंतर आम्ही ठाण्यात पहिले स्मारक शहीद उद्यानच्या रूपाने उभारले आहे. त्याच शहीद उद्यानात कारगिल दिवस, प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना आम्ही शहिदांच्या आठवणीत भारावून जातो. याच कार्यक्रमाला आम्ही तुला कित्येक वेळी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले आहे. त्यामुळे नरेश हे फक्त तुझ्या स्मरणात राहू दे. आणि मी जे काही विधानं केली त्यात सैन्याच्या अवमानाचा प्रश्नच येत नाही. तुला फक्त घाणेरडे राजकारण करायची जणू सवयच जडली आहे. त्यामुळे आता तरी प्रगल्भ बुद्धी वापरण्यास सुरुवात कर.. असे या पत्रात म्हटले होते.

म्हस्के काय म्हणाले ?

राजन विचारे यांचे पत्र सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. त्यानंतर म्हस्के यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. म्हस्के म्हणाले की, पत्रास उत्तर देईन नंतर..आज तुमचा वाढदिवस, तुम्हांला शुभेच्छा निरंतर! राजकीय दावे प्रतिदावे होतच राहणार…असू नये कलूशीत अंतर.. पुस्तकं काय सगळ्यांचीच आहेत, सगळेच उघडू शकतात, पण आज नाही…कधीतरी नंतर. वाढदिवसाच्या आभाळभर शुभ इच्छा… असे म्हणत म्हस्के यांनी राजन विचारे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देत अप्रत्यक्ष इशारा दिला.