India vs Pakistan Shivsena Protest in Thane : ठाणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना आता भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडाडून विरोध केला असून ठाण्यात ठाकरे गटाने पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कुंकूने भरलेले डबे पाठविले जात असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केला. तसेच राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्याचे निर्देश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर आंदोलन देखील करण्याचे आदेश शिवसेना भवनातून आल्यानंतर सर्वत्र आंदोलनाला सुरुवात झाली. ‘माझे कुंकू, माझा देश’ असे म्हणत ठाकरेंचे शिवसैनिक आंदोलनात उतरले आहेत.
पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने त्याविरोधात ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले. शहीदो के सन्मान में, देशभक्त उतरे मैदान मे…, क्रिकेट नाही, युद्ध खेळू, ….. पाकिस्तान मुर्दाबाद.. च्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना खेळवून शहिदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंदूर पाठवून पहलगामच्या भ्याड हल्याची आठवण यावेळी करून दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळ हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळला. तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही मोदींची पोकळ घोषणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी जाहीर सभामधून मोठमोठ्या घोषणा केल्या. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही अशी घोषणा दिली होती. मात्र काही दिवसांतच नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला याचा विसर पडला. देशवासीयांच्या भावनांचा विचार न करता आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली. मोदींना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेने आंदोलन पुकारल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.