कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आठ दरोडेखोरांनी देवगिरी एक्सप्रेसमधील ११ प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले. काही प्रवाशांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण केली. मंगळवारी पहाटे साडे चार वाजता कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार घडला. दरोडेखोरांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. सर्व आरोपी औरंगाबाद भागातील रहिवासी आहेत. ते १९ ते २६ वयोगटातील आहेत. पत्रकार साईनाथ शंकरराव कांबळे (३२, रा. जिगळा, औरंगाबाद) असे तक्रारदाराचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कल्याण पूर्व सिध्दार्थनगर रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालकांचा बंद; प्रवाशांचे हाल

रोहित संजय जाधव (२१, उस्मानापूर पोलीस ठाणे जवळ, उस्मानापूर, औरंगाबाद), विलास हरी लांडगे (२६, राजनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद), कपील उर्फ प्रकाश रमेश निकम (१९, रा. उस्मानापूर, नागशेन नगर), करण शेषराव वाहने (२३, फुले नगर, उस्मानपुरा), राहुल राजू राठोड (१९, कांचनवाडी, पैठणरोड, औरंगाबाद), नीलेश सुभाष चव्हाण (१९, रा. मुकुंदवाडी, अंबिकानगर, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन दरोडेखोर अल्पवयीन आहेत. पत्रकार साईनाथ शंकरराव कांबळे (३२, रा. जिगळा, औरंगाबाद) असे तक्रारदाराचे नाव आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पत्रकार कांबळे यांनी तक्रार केली आहे.

हेही वाचा- कल्याणमध्ये मोटारीच्या काचा फोडून कारटेपच्या चोऱ्या

पोलिसांनी सांगितले, साईनाथ कांबळे हे आपल्या कुटुंबीयांसह महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमानिमित्त मुंबईत येण्यासाठी देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करत होते. सोमवारी संध्याकाळी नांदेड रेल्वे स्थानकातून त्यांनी देवगिरी एक्सप्रेसने प्रवास सुरू केला होता. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकात आली. कसारा रेल्वे स्थानक एक्सप्रेसने सोडताच, एक इसम साईनाथ यांच्या जवळ येऊन मला गांजा दे असे बोलू लागला. आपल्या जवळ गांजा नाही असे बोलताच, इतर पाच जण साईनाथ यांच्या भोवती जमवून त्यांना शिवीगाळ, मारहाण करू लागले. एका दरोडेखोराने धारदार चाकू साईनाथ यांच्या मानेवर ठेवला व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने डब्यातील इतर प्रवासी घाबरले. आता आपण लुटले जाऊ या भीतीने कोणी प्रवासी काही बोलत नव्हता. इतर ११ प्रवाशांबरोबर दरोडेखोरांनी गैरवर्तन करुन पैसे, मोबाईल लुटमारीचे प्रकार केले. कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार सुरू होता. दरोडेखोर कल्याण रेल्वे स्थानकात उतरतील असे प्रवाशांना वाटले. ते मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

हेही वाचा- कल्याणमधील कोटक महिंद्रा बँकेत बनावट नोटा बदलण्याचा ग्राहकाचा प्रयत्न

कल्याण स्थानक येताच पत्रकार कांबळे यांनी दरोडेखोरांची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पथक तयार करुन दादर पोलिसांना माहिती देत, कल्याण ते दादर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सापळा लावून आठ दरोडेखोरांना अटक केली. यामधील दोन जण अल्पवयीन आहेत. साईनाथ यांच्या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दरोडेखोरांनी यापूर्वी इतर भागात दरोडे टाकले आहेत का. ही टोळी कधीपासून सक्रिय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या वर्षभरातील एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याची ही तिसरी घटना आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six persons arrested from aurangabad who robbed devagiri express between kasara kalyan dpj
First published on: 07-12-2022 at 15:22 IST