बदलापूरः एरवी सकाळच्या सत्रात सातत्याने विलंबाने धावणाऱ्या लोकलगाड्या नोकरदार वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यातच आता सण उत्सवांच्या अर्थात सुट्ट्यांच्या काळातही लोकल सेवा विलंबानेच सुरू असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. गुरूवारी भाऊबिजेच्या दिवशी कर्जतहून मुंबईकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलगाड्या सुमारे ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. आधीच वातावरणातील बदलामुळे प्रवासी घामाघुम होत असताना गर्दीने भरलेल्या लोकलगाड्यांमध्ये होणारा खोळंबा यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण होते.
गुरूवारी भाऊबिजेच्या निमित्ताने भाऊ आणि बहिणी प्रवासासाठी बाहेर पडल्या होत्या. गेल्या काही महिन्यात ठाणे आणि कल्याण पल्याडचा रस्ते प्रवास कोंडीचा होतो आहे. बदलापुरसारख्या शहरातून कल्याणपर्यंत पोहोचण्यासाठी दीड तासाहून अधिकचा काळ लागतो आहे. ठाणे शहरातून परतीचा प्रवासही असाच वेळखाऊ बनला आहे. त्यामुळे अनेक नागरिक आता लोकल प्रवासाला पसंती देत आहेत. गुरूवारी बदलापूर, अंबरनाथ या कर्जत मुंबई मार्गावरील तसेच कल्याण कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. मात्र ऐन सणाच्या काळातही लोकल विलंबानेच सुरू होत्या.
दुपारी बदलापूर स्थानकातून सुटणाऱ्या लोकलगाड्या येतानाच उशिराने येत होत्या. त्यामुळे त्या पुन्हा विलंबाने मुंबईसाठी रवाना होत होत्या. काही लोकलगाड्या बदलापुरातून दहा ते पंधरा मिनिटांने रवाना होत होत्या. मात्र पुन्हा विठ्ठलवाडी आणि कल्याण स्थानकात आणखी काही मिनिटे रेंगाळत होत्या. त्यामुळे ठाणे, दादर आणि मुंबईपर्यंत पोहोचणाऱ्या लोकलगाड्या ३० ते ४० मिनिटांपर्यंत उशिराने धावत होत्या. कसारा ते मुंबई या मार्गावरही लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. काही एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देऊन लोकलगाड्या मागे ठेवल्याने लोकल २० ते २५ मिनिटांने उशिराने धावत होत्या.
एक्सप्रेस गाठताना कसरत
एक्सप्रेस प्रवासासाठी तासभर आधी स्थानकात पोहोचण्याच्या सूचना लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र एक्सप्रेस थांबा असलेल्या महत्वाच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या लोकलगाड्याच ३० ते ४० मिनिटे उशिराने धावल्यास स्थानकात पोहोचून एक्सप्रेस पकडायची कशी असा प्रश्न रेल्वे प्रवासी उपस्थित करत होते. गुजरातच्या सुरत येथे जाण्यासाठी दादरहून एक्सप्रेस पकडण्यासाठी बदलापुरहून १२ च्या सुमारास निघालो. मात्र १२ वाजून १५ मिनिटांची लोकल तब्बल ३५ मिनिटे उशिराने दादरला पोहोचली. सुदैवाने तीन तास आधी निघाल्याने वेळेत पोहोचलो, अन्यथा मुळ एक्सप्रेस सुटली असती अशी प्रतिक्रिया अजयभाई थाटे यांनी दिली.
आधीच गर्दी, त्यात घामाघुम
गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर उकाडा जाणवतो आणि सायंकाळी पावसाच्या सरी कोसळतात असा अनुभव येतो आहे. लोकलविलंब आणि त्यात गर्दीने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. गर्दीत जागेअभावी प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत होता. त्या घामांच्या धारांनी प्रवाशांच्या अडचणीत भर घातली. रेल्वेच्या वतीने लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्याचे कारण सांगितले जात नव्हते.
