ठाणे – जिल्ह्यात सध्या रक्ताची कमतरता निर्माण झाली असून, सार्वजनिक रुग्णालये, रक्तपेढ्या आणि शासकीय वैद्यकीय केंद्रांमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा जाणवत आहे. दिवाळीनंतरच्या सुट्ट्यांचा काळ, सणसमारंभ, महाविद्यालयांतील परीक्षा आणि रक्तदान शिबिरांचे कमी आयोजन या कारणांमुळे रक्तदानाचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे. परिणामी, आपत्कालीन रुग्णसेवा आणि शस्त्रक्रिया विभागांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्ववभूमीवर नागरिकांना रक्तदान करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालय, खासगी अथवा शासकीय कार्यालयांमध्ये तसेच अनेक मंडळ, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांच्या माध्यमातून रक्तसंकलन करून शासकीय रक्तपेढ्या, रुग्णालय यांसारख्या ठिकाणी पाठवले जाते. येथून रुग्णांच्या मागणीनुसार रक्तपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून रक्तदान केंद्रांतील आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक साठा संपत आला आहे.
अपघातग्रस्त, कर्करोग, थॅलेसेमिया, डेंग्यू, डिलिव्हरीनंतर रक्तस्राव झालेल्या महिला आणि विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर रक्ताची मागणी होते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी यांनी सांगितले की, “दिवाळी आणि सणासुदीच्या काळात रक्तदानाचे प्रमाण घटते. परिणामी, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या परिस्थितीत रुग्णांना रक्तपुरवठा करणे कठीण होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदार समाजघटक म्हणून रक्तदानात सहभागी व्हावे. सद्यस्थितीत काही अंशी साठा जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये आहे. मात्र हा साठा अल्प असून ही परिस्थिती कायम राहिली, तर पुढील काही दिवसांत रुग्णसेवेत अडथळे येऊ शकतात.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे. रक्तदान शिबिर आयोजित करावयाचे असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी ( ९८६९६८५२८२ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
