Cultural Empowerment Thane: संस्कृती, परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. आई-वडिल, आजी-आजोबा आपल्या मुलांना संस्कृतीचे महत्त्व पटवून देत असतात. अशाच प्रकारे नवरात्रौत्सवाचे महत्त्व पुढच्या पिढीला समजावे यासाठी ठाण्यातील काही मातांनी एकत्रित येत नवरात्रौत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन केले आहे. या नवरात्रौत्सवाची चर्चा संपूर्ण ठाणे शहरात रंगली आहे.

नवरात्रौत्सवाचा आज सातवा दिवस आहे. सर्वच ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे शहरात ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला बंगाली भाषकांच्या नवरात्रौत्सव सुरु होतो. ठाणे शहरात बंगाली भाषकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी या समाजाने समिती स्थापन केल्या असून यांच्यामार्फत दुर्गोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी ठाणे शहरात बंगाली भाषकांच्या दुर्गोत्सव मंडळाच्या संख्येत आणखी एका मंडळाची भर पडली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्ये म्हणजे, या संपूर्ण मंडळाची जबाबदारी महिला वर्ग पार पाडत आहे.

सण-उत्सवाची संस्कृती परंपरा आपल्या मुलांना समजावी त्यांना याचे महत्त्व समजावे यासाठी सर्व मातांनी एकत्रित येत यंदा या दुर्गोत्सवाची सुरुवात केली आहे. ठाणे येथील भाईंदरपाडा भागात हा दुर्गोत्सव साजरा केला जात आहे. ‘शिकोरेर खोजे दुर्गोत्सव’ असे या मंडळाचे नाव आहे. या दुर्गोत्सवाच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालहून महिला ढोलताशा पथक बोलावण्यात आले होते. या महिला ढोलताश पथकांच्या सादरिकरणासह दुर्गादेवीची पूजा करण्यात आली. ठाणे तसेच मुंबई या शहरात बंगाली समाजाचा दुर्गोत्सव साजरा करणारे हे पहिले महिला मंडळ आहे. “ही पूजा बंगालच्या संस्कृतीची अस्सल छटा जपत, स्त्रीशक्तीचे नेतृत्व आणि कलागुण साजरे करणारी ठरावी,तसेच या उपक्रमाद्वारे स्त्रियांचा सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग वाढविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा देखील या मागचा मुळ उद्देश असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.

स्त्रीप्रधान सांस्कृतिक उपक्रम

पारंपरिक दुर्गापूजेच्या चौकटीपलीकडे जात, हा नवा उत्सव संपूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली साजरा केला जात आहे. या मंडळाच्या अध्यक्षा प्रियांका बनर्जी यांनी सांगितले की, अनुभवी कारागिरांच्या हस्तकौशल्याने सुमारे २,४०० चौरस फूट क्षेत्रफळावर या दुर्गोत्सवाचे विषयाधिष्ठित पंडाल उभारण्यात आले आहे. हा पंडाल बंगालमधील ग्रामीण जीवनशैली आणि निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवणारे आहे. या दुर्गोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे, सुमारे १० फूट उंचीची पारंपरिक स्वरूपातील माँ दुर्गेची भव्य मूर्ती, जी भक्त आणि कला-रसिकांचे मन मोहून टाकणारी आहे.