Thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे महापालिकेने करोडो रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतनचे (Gadkari Rangayatan) लोकार्पण काही दिवसांपुर्वी केले. मात्र, नुतनीकरण कामादरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची असलेली ऐतिहासिक अशी कोनशिला अडगळीत पडल्याचे समोर आले होते. यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टिकाही झाली होती. आता ठाणे पालिका प्रशासनाला गांभीर्य राहिले नाही का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे (Rajan Vichare) यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गावदेवी मैदानातील भर सभेत एका ठाणेकरांनी एक चिठ्ठी पाठविली. त्यामध्ये नाट्यगृह आणि स्टेडियम उभारणीची मागणी केली होती, त्या चिठ्ठीवर तात्काळ प्रतिक्रिया देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्ता द्या, तुम्हाला नाट्यगृह आणि स्टेडियम देतो असे आश्वासन ठाणेकरांना दिले होते. यानंतर ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिल्यानंतर बाळासाहेबांनी शब्द पूर्ण केला.
२५ ऑक्टोंबर १९७४ रोजी राम गणेश गडकरी रंगायतनचे भूमिपूजन झाले तर १५ डिसेंबर १९७८ रोजी राम गणेश गडकरी रंगायतनचे लोकार्पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर १४ मार्च १९९९ रोजी पुन्हा या वस्तूचे नूतनीकरण करून त्यांच्याच हस्ते पुन्हा उद्घाटन करण्यात आले. नाट्यगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्याने त्यांच्या नावाची पाटी (कोनशिला ) बसविण्यात आली होती. आजतागायत ही कोनशिला ठाणेकर रसिक आणि नाट्यप्रेमींना दिसेल अशी दर्शनी भागात होती. ही कोनशिला समोर दिसताच जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेबांचे स्मरण होत असे, असे राजन विचारे यांनी म्हटले आहे.
अन्यथा आंदोलन करू
ठाणे महापालिकेने करोडो रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतनचे लोकार्पण काही दिवसांपुर्वी केले. मात्र, नुतनीकरण कामादरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची असलेली ऐतिहासिक अशी कोनशिला अडगळीत बसवविण्यात आली आहे. त्यामुळे रसिक व नाट्यप्रेमी तसेच शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आता ठाणे पालिका प्रशासनाला गांभीर्य राहिले नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. असे असताना आठ दिवसाच्या आत ही कोनशिला दर्शनी भागात लावावी, अन्यथा पालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विचारे यांनी दिला आहे.