ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर होताच, माजी नगरसेवकांसह इच्छूकांनी प्रभागात निवडणुक लढण्याची तयारी सुरू केली आहे. असे असले तरी, ठाणे महापालिकेच्या निवडणुक विभागाने प्रभागनिहाय आरक्षण अहवाल तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला असून त्यापाठोपाठ आता अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्गीय प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत प्रक्रिया आज, मंगळवारी होणार आहे. यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छूकांची धाकधूक वाढली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण प्रक्रिया मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्गीय प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची ही सोडत असणार आहे. या कार्यक्रमाकडे ठाण्यातील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. सोडतीनंतर आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येतील.

हा प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला जाणार असून, हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी १७ ते २४ नोव्हेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) मुदत दिली जाईल. नागरिकांनी आपले अभिप्राय लेखी स्वरूपात ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात किंवा संबंधित प्रभाग समितीत सादर करावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच ऑनलाईन अथवा ई-मेलद्वारे सादर केलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची प्राथमिक तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. नुकताच प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून, त्याआधारे ११ नोव्हेंबरची सोडत होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी ९, अनुसूचित जमातींसाठी ३, ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आणि महिलांसाठी एकूण ६६ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सध्याची प्रभागरचना २०११ च्या जनगणनेवर आधारित २०१७ प्रमाणेच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागसंख्येत कोणताही बदल होणार नाही. ठाणे शहरात एकूण ३३ प्रभाग असून त्यातून १३१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग आरक्षणातही फारसा बदल होणार नसल्याचे बोलले जात आहे.