ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर प्रवाशांना, चालकांना रोखून त्यांना शस्त्रास्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे अन्वेषण कक्षाने अटक केली. राजेंद्र यादव (२७), मोहम्मद अन्सारी (३६), अब्दुल रहीम अन्सारी (३०), सद्दाम अन्सारी (३०), शिवकुमार उराव (४०), अरविंद यादव (२१) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील राजेंद्र यादव हा पूर्वी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात दरोडेखोर येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे अन्वेषण कक्षाचे पोलीस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पथकाने काहीजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यांच्या वाहनात दरोड्यासाठी लोखंडी कटावणी, कोयता, मिरची पूड आणि दोरी आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र यादव, मोहम्मद, अब्दुल, सद्दाम, शिवकुमार, अरविंद यांना अटक केली.
राजेंद्र हा पूर्वी नक्षलवादी कारवायांमध्ये होता. २०२२ मध्ये त्याला अटक झाल्यानंतर तो काही वर्षांनी जामीनावर सुटला. परंतु त्यानंतर त्याचा नक्षली कारवायांमध्ये सहभाग आढळून आला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.