Thane Crypto Cell / ठाणे – गेले काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सायबर गुन्ह्यांचा तपास करत असताना, गुन्हेगार गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत असल्याचे आढळून येते. त्यामुळे अपहारित रक्कमेचा माग काढणे आणि ती रक्कम हस्तगत करणे पोलिसांना अवघड जात आहे.

यासाठी क्रिप्टोकरंसी संबधीत तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेवून ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची’ स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील हे पहिले क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्ष असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली.

अलीकडच्या काळातील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून ठाणे पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात यापूर्वी सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परंतू, या गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर तज्ज्ञ आवश्यक असल्याची बाब लक्षात घेवून त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सायबर तज्ज्ञांची नेमणूक केली.

परंतू, या सायबर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले की, गुन्हेगार गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून अपहार करत आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे पोलिस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाणे येथे ‘क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाची’ स्थापना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कक्षामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्यातील क्रिप्टोकरंसीबाबत विशेष प्राविण्य असलेल्या पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना क्रिप्टोकरंसी संबंधाचे प्रशिक्षण देणार असून तपासातही मदत करणार आहेत.

त्यामुळे फसवणूकीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्षाचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल, ठाणे चे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश वारके हे उपस्थित होते.

क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्ष म्हणजे काय

क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष म्हणजे एक विशेष केंद्र किंवा सुविधा जिथे क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण केले जाते. या कक्षामध्ये विविध क्रिप्टोकरन्सींचा कार्यप्रणाली, सुरक्षितता, व्यवहार प्रक्रिया यांचा अभ्यास केला जातो. तसेच ब्लॉकचेन नेटवर्क, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि व्यवहार पडताळणी यांचे तांत्रिक विश्लेषण केले जाते. सुरक्षा व धोका व्यवस्थापनावर लक्ष देऊन फसवणूक, हॅकिंग आणि स्कॅम्स ओळखणे व त्यापासून बचावाचे मार्ग शोधणे ही या कक्षाची जबाबदारी आहे.