ठाणे : दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण असला तरी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निर्माण होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरत आहे. यासाठी ठाण्यातील मो.ह विद्यालय यांच्यावतीने तलावपाळी येथे प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विद्यार्थ्यांनी नागरिकांना यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त, हरित आणि आरोग्यदायी करण्याचे आवाहन केले.

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित मो. ह. विद्यालय आणि ब्लॉसम इंग्लिश स्कूल यांच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा या विद्यालयाने दिवाळी निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. दिवाळी हा उत्साहाचा सण आहे. अनेक नागरिक फटाक्यांची आतषबाजी करत हा सण साजरा करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांच्या अतिरेकामुळे निर्माण होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण आरोग्य, पर्यावरण आणि समाजासाठी गंभीर समस्या ठरत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त, हरित आणि आरोग्यदायी करण्याचे आवाहन जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित मो. ह. विद्यालय आणि ब्लॉसम इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.

रॅली दरम्यान ‘प्रदूषणमुक्त दिवाळी – करू आनंदाने साजरी’ अशा घोषणा करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या हातात आकर्षक फलक होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी सांगितले की, दिवाळी हा उत्सव आनंदाचा असला तरी फटाक्यांच्या अतिरेकामुळे निर्माण होणारा धूर, रासायनिक वायू आणि मोठा आवाज हे हानिकारक आहेत. विशेषत: लहान मुले, वृद्ध, रुग्ण तसेच प्राणी-पक्षी यांना त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे किंवा अत्यंत अत्यंत मर्यादित प्रमाणात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवे, मातीचे दिवे, फुलांची आरास, नैसर्गिक रंग वापरावी आणि पारंपरिक पद्धतींचा वापर करून सण साजरा करण्यावर भर दिला. लाऊडस्पीकर आणि डीजेचा अनावश्यक वापर टाळावा, परिसर स्वच्छ ठेवावा आणि “हरित दिवाळी” साजरी करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सुचवले. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन, पुढील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, निरोगी वातावरण आणि स्वच्छ भारत घडविण्यासाठी हातभार लावावा, असे देखील विद्यार्थ्यांचे आवाहन आहे.