ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच, आता शहरात नवीन अनधिकृत बांधकामे उभीच राहू नयेत यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. काही बीट मुकादमांकडून अशा बांधकामांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याचे निदर्शनास येताच, सहाय्यक आयुक्तांपासून ते बीट मुकादमांपर्यंत सर्वांना पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याच्या तक्रारीही यापुर्वी पुढे आल्या होत्या. मागील अडीच-तीन वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत ही बांधकामे सुसाट पद्धतीने उभी राहू लागली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या बांधकामांवर कारवाई करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावल्याचे चित्र आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शीळ परिसरात आयुक्त सौरभ राव यांना स्वत: जाऊन कारवाई करण्याची नामुष्की ओढावली होती. तसेच बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर सातत्याने टिका होत आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली होती. जून ते सप्टेंबर २०२५ या काळात, महापालिकेने २६४ बेकायदा बांधकामांवर कारवाई केली.

ठाणे महापालिकेचे बीट मुकादम हे प्रभाग समिती स्तरावर काम करतात आणि ते अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यांची नोंदणी नोंदवहीत करतात. या मुकादमांनी दिलेल्या माहितीची बीट निरिक्षक खात्री करून तसा अहवाल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला देतात. त्याआधारे, महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही कार्यपद्धती अस्तित्वात आहे. असे असले तरी नोंदवहीत झालेल्या काही बांधकामांवर कारवाई झालेली नसल्याची बाब यापुर्वीच पुढे आली होती. त्यातच आता काही बीट मुकादमांकडून अशा बांधकामांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. यामुळेच नवीन बेकायदा बांधकामांची नोंद ठेवली नाहीतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांपासून ते बीट मुकादमांपर्यंत सर्वांना दिला आहे.

शहरात नवीन अनधिकृत बांधकामे उभीच राहू नयेत यासाठी काळजी घेण्यात येत आहे. बेकायदा बांधकामांची नोंद करण्याची जबाबदारी बीट मुकादम यांच्यावर असून त्यापैकी काहीजण व्यवस्थित जबाबदारी पार पाडत नव्हते. यामुळे या सर्वांना आता दररोज प्रभागातील बांधकामांची माहिती नोंदविण्याची आदेश दिले आहेत.

बांधकाम असेल तर त्यांची माहिती लिहा आणि नसेल तर, निरंक लिहा, अशा सुचना दिल्या आहेत. या माहितीचा अहवाल सहाय्यक आयुक्तांनी दर आठ दिवसांची सादर करावा, अशा सुचना दिल्या आहेत. बांधकाम आढळून आले तर कायदेशीर प्रक्रीया उरकून कारवाई करण्यात येईल. बांधकामधारकाने बांधकाम स्वत:हून काढले नाहीतर ते पालिका काढले आणि त्याचा खर्च बांधकामधारकाकडून वसुल करेल, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.