ठाणे : सरकारी कामात ‘चिरीमिरी’ घेणाऱ्यांमुळे दिवसागणिक लाचखोरीच्या प्रकरणांत वाढ होत असून मागील आठ महिन्यात ठाणे ते सिंधुदूर्गपर्यंत लाचखोरीची ६८ प्रकरणे आणि एक अपसंपदाचे प्रकरण उघडकीस आले आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारीनुसार यामध्ये सर्वाधिक महसूल, पोलीस आणि महावितरण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळ्याद्वारे १०३ जणांविरोधात गुन्हे दाखल केले.
शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये सर्व सामान्य नागरिक नेहमी विविध कामांसाठी जात असतात. कार्यालयात गेल्यानंतर आपले काम लवकरात लवकर व्हावे ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना अनेक अडथळ्यांचा सामना सहन करावा लागतो. शासकीय काम पूर्ण करण्यासाठी अनेकदा लाचेची मागणी केली जाते. या लाचखोरीच्या तक्रारी देण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हे आणि तपास दाखल केले जातात.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे क्षेत्रा अंतर्गत ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग पर्यंतचा भाग येतो. ठाणे विभागामध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या कालावधीत लाचेची ६८ प्रकरणे समोर आली असून एक प्रकरण अपसंपदाचे दाखल आहे. २०२४ मध्ये याच कालावधीत ५१ लाचेची आणि सात अपसंपदेची प्रकरणे उघड झाली होती.
सर्वाधिक कारवाई महसूल आणि पोलीस
लाचेची सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागातील आहेत. ६९ लाचेची आणि अपसंपदेच्या एका प्रकरणात पोलिसांनी १०३ जणांना अटक केली होती. त्यापैकी २२ जण हे महसूल विभागातील विविध पदावर कार्यरत कर्मचारी आहे. त्यासोबतच, पोलीस १० महावितरण विभागाच्या पाच आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पाच जणांचा सामावेश आहे.
कोणत्या परिक्षेत्रात किती प्रकरणे
परिक्षेत्र – गुन्हे
- ठाणे – ३५ (एक अपसंपदा)
- पालघर – ०६
- नवी मुंबई – १०
- रायगड – ०९
- रत्नागिरी – ०५
- सिंधुदूर्ग – ०४
- एकूण – ६९