ठाणे : सध्या सगळीकडे नवरात्रौत्सवाची धूम सुरु आहे. अनेक मंडळांमध्ये देवीची प्रतिष्ठापना झाली आहे. पारंपारिक पद्धतीने आणि संस्कृती जपत हा नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. परंतू, नवरात्रौत्सव साजरा करताना आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेने ठाण्यातील एका नवरत्रौत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सर्वचजण कौतूक करत आहेत.
गणेशोत्सवात दरवर्षीच विविध मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले जातात.तर, काही मंडळांकडून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे अशी गणेशोत्सव मंडळ नेहमीच चर्चेत राहतात. गणेशोत्सवा पाठोपाठ नवरात्रौत्सव येत असतो. पूर्वी ठाणे शहरात इतक्या मोठ्यासंख्येने नवरात्रौत्सव साजरा करणारी मंडळे नव्हती. त्यानंतर, कालांतराने नवरात्रौत्सवाच्या मंडळांमध्ये देखील वाढ झाली. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला आहे.
ठाणे शहरात विविध भागातील लहान – मोठ्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने देवीची प्रतिष्ठापना केली आहे. काही मंडळांमार्फत आकर्षक असा देखावा देखील साकारण्यात आला आहे. तर, अनेक मंडळे विविध संकल्पांवर आधारित नवरात्रौत्सव साजरा करत आहेत. असेच ठाण्यातील एका मंडळाने सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला आहे.
नवरात्रौत्सवाच्या नऊ दिवसात देवीची खणा नारळाने किंवा साडीचोळीने ओटी भरण्याची परंपरा रुढ आहे. परंतू, ही परंपरा कायम ठेवत ठाण्यातील यशोधन नगर परिसरातील श्री दुर्गादेवी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे.
यंदा या मंडळाचे १६ वे वर्षे आहे. या मंडळाचे वैशिष्ट्ये म्हणजे परिसराती सर्व पूरुषमंडळी महिला तसेच लहान मुले एकत्रित येत या उत्सवाची तयारी करतात. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.या भावनेने यंदाच्या वर्षी मंडळांने भाविकांना आवाहन केले आहे की, दरवर्षी देवीची आपण ओटी भरतो.
परंतू, यंदा ओटीसह देवीच्या चरणी एक वही, पेन, कंपासपेटी, कलरबॉक्स असे विविध शैक्षणिक साहित्य अर्पण केले तर, गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आपणही या मदतीसाठी स्वेच्छेने सहभागी व्हा असा आवाहन करणारा फलक मंडळाने देवीच्या मंडपात लावला आहे. त्यानुसार, दर्शनासाठी येणारे भाविक देखील खणा नारळाच्या ओटीसह देवीच्या चरणी शैक्षणिक साहित्याची ओटी भरत आहेत.