ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘दिशा’ उपक्रम, शाळांचे डिजिटायझेशन, मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत राबविलेले उपक्रम आणि प्रशासकीय कामकाजातील आमूलाग्र बदल या माध्यमातून घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे १९ जून २०२४ मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर, त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज पारदर्शक पद्धतीने आणि गतिमान करण्यावर भर दिला. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, स्पर्धा परिक्षेसाठी हे विद्यार्थी तयार व्हावे यासाठी त्यांनी कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करुन दिशा प्रकल्प हाती घेतला होता. याप्रकल्पाची राज्यभरातून कौतूक करण्यात आले.

ग्रामीण भागातील शिक्षण डिजिटलायझेशण करणे, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यासह, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटीकरण करण्याचे काम केले. तसेच स्वातंत्र्यापासून जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ या आदिवासी वाडीवरील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाडीवर दाखल झाले. तेथील रस्ते, शाळा यासह घरकुलांचे प्रश्न मार्गी लावले. तसेच रस्त्याच्या कामाचा नारळ देखील स्वातंत्र्य दिनी वाढवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांच्या पोचपावती म्हणून रोहन घुगे यांना जळगाव जिल्हाधिकारी पदी बढती मिळाली असल्याचे दिसून येत आहे.