Thane Zilha Parishad Election Latest News : राज्यात बहुप्रतिक्षित अशा जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले असून निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग तसेच पंचायत समित्यांमधील निर्वाचक गण व गटांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे यंदाही ठाणे जिल्हा परिषदेची धुरा महिलेच्या खांद्यावर राहणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या या निवडणुका आता निश्चितपणे होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यानंतर या निवडणुकीतील पुढील टप्पा म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर जिल्हा परिषद विघटित करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या होत्या. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर, २०२२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपूष्टात आल्यानंतर आतापर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी प्रभाग रचनेवर हरकती सूचना देखील मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली. अशातच आता, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा ही जिल्हा परिषदेची धुरा महिला अध्यक्षांच्या खांद्यावर असणार हे स्पष्ट झाले आहे.

पंचायत समिती सभापती पदासाठीही आरक्षण जाहीर

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासह पंचायत समितीच्या सभापती पदासाठीचे आरक्षण देखील जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी दोन, सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक महिला आणि एक आरक्षण तर, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी एक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.