ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केवळ २५ खाटांची क्षमता असताना ३२ महिला दाखल असून, शनिवारी आणखी आठ महिला प्रसूतीसाठी प्रतीक्षेत होत्या. त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत होता. या प्रकारामुळे गरोदर महिलांची दगदग झाल्याने नातेवाईकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

ठाणे महानगरपाालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय आहे. येथे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांबरोबरच भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. यामुळे या रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी असते. रुग्णालयातील सेवा सुविधांविषयी सातत्याने तक्रारी येत असतानाच, शनिवारी गरोदर महिलांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आल्याचा प्रकार समोर आला आहे.

रुग्णालयातील प्रसूतीगृहात केवळ २५ खाटांची क्षमता असताना येथे ३२ महिला दाखल आहेत, तर शनिवारी आणखी ८ महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. मात्र, जागा नसल्याने त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मुंबईतील केईएम रुग्णालयात आल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दीर्घकाळापासून असणाऱ्या सोयीसुविधांचा अभाव, खाटांची कमतरता आणि अनागोंदी कारभार हे मुद्दे वारंवार पुढे येत असले तरी, अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा पुढे आले आहे.

ठाण्यातील डिसुझावाडी येथील एका गरोदर महिलेला तिचे पती प्रमोद शर्मा हे शनिवारी कळवा रुग्णालयात घेऊन आले. त्यावेळी रुग्णालयात जागा नसल्याने त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. शर्मा यांनी सांगितले, “ डिझोजावाडी येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात पत्नीची वेळोवेळी तपासणी होत होती. प्रसुतीची तारीख आल्यामुळे त्यांनी कळवा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिथे गेल्यावर त्यांनी जागाच उपलब्ध नसल्याचे सांगत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु त्याआधी एका महिला डॉक्टरांनी “सोनोग्राफी करून या, तोवर बेड मिळेल तर दाखल करतो” असे सांगितले, पण सोनोग्राफी केल्यानंतर पुन्हा “येथे जागा नाही, जिल्हा रुग्णालयात जा” असा सल्ला देण्यात आला. यामुळे आमची धावपळ झाली.”

ठाणे शहर आणि आसपासच्या शहरातून कळवा रुग्णालयात महिला प्रसुतीसाठी येतात. अनेकदा प्रसुती शस्त्रक्रीयेसाठी रुग्णालये कळवा रुग्णायात पाठवितात. यामुळे अशा रुग्णांचा भार वाढतो आणि काहीवेळेस येथे उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे संबंधित महिलांना ठाणे जिल्हा किंवा मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात येते. – डाॅ. राकेश बारोट अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा