डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत चोरीला गेलेले, पादचाऱ्यांकडून लुटलेले चार लाख १४ हजार रुपये किमतीचे ३७ मोबाईल मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले आहेत. हे मोबाईल महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तमीळनाडू, कर्नाटक, बिहार राज्यांमधून हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊन गुन्हे दाखल झाले होते. दर महिन्याला सात ते आठ घटना मोबाईल चोरीच्या होत असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, सुनील तारमळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गडगे, राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, यलप्पा पाटील, महादेव पवार, प्रवीण किनरे, महेंद्र मंझा यांचे तपास पथक तयार केले होते.

हेही वाचा: कल्याण: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ लोंबकळणाऱ्या केबल वाहिनी जवळूनच प्रवाशांची ये-जा

तक्रारदार दाखल करणाऱ्या अनेक तक्रारदारांनी मोबाईल खरेदीच्या पावत्या पोलीस ठाण्यात दाखल केल्या होत्या. या दाखल पावतीवरील मोबाईलचा चिप क्रमांकाचा आधार घेऊन पोलिसांनी सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंन्टी रजिस्टर (सीईआयआर) या संकेतस्थळाचा उपयोग करुन चोरीला गेलेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती मिळवली. या माहितीवरुन मोबाईलची ठिकाणे निश्चित झाली. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्राच्या विविध भागात याशिवाय इतर राज्यांमध्ये चोरट्यांनी चोरुन तेथील दुकानदार, नागरिकांना स्वस्तात विकलेले मोबाईल हस्तगत केले. ज्या तक्रारदारांकडे मोबाईल खरेदीच्या पावत्या नव्हत्या. त्यांनी मोबाईलची पोलीस ठाण्यात येऊन ओळख पटवून मोबाईल ताब्यात घेतले.

हेही वाचा: ठाणे: संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवावरून अखिल भारतीय नाट्य परिषदेचा महापालिकेवर आरोप; शिंदे-ठाकरे गटाचीही किनार?

हस्तगत मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून परत देण्यात आले. मोबाईल चोरणारे चोरटे मोबाईल चोरी नंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी परराज्यात पळून जातात. तेथे ते कमी किमतीला चोरीचे मोबाईल विकतात. तेथून फरार होतात, असे पोलिसांनी सांगितले. एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल हस्तगत करण्याची कल्याण, डोंबिवलीतील ही पहिलीची महत्वाची घटना आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty seven stolen mobile phones worth rs four lakh recovered performance of manpada police dombivali tmb 01
First published on: 06-12-2022 at 13:00 IST