स्मार्ट सिटी प्रकल्पाची कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कामे गतीने पूर्ण व्हावीत. या भागातील रस्ते वाहतूक कोंडी मुक्त असावेत या विचाराने स्मार्ट सिटी प्रकल्पाचे महत्वाचे काम पूर्ण होईपर्यंत कल्याण बस आगार, परिसरातील मुख्य रस्त्यांवरुन सोडण्यात येणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस दुर्गाडी किल्ला गणेश घाट आणि मुरबाड रस्त्यावरील केडीएमटी गणेश घाट आगारातून सोडण्याचा महत्वपूर्ण पालिका प्रशासनाने घेतला आहे. ५ डिसेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बदलापुरात लवकरच नवे जलशुद्धीकरण केंद्र

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीच्या विषयावर वाहतूक, पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. या कामात कोणतीही गती नसल्याने त्याचा त्रास रस्ते वाहतुकीवर होत आहे. पश्चिम भाग फेरीवाले, रिक्षा चालक, खासगी वाहने आणि पादचाऱ्यांनी गजबजून गेलेले असतात. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, रिक्षा, बस चालक हैराण आहेत. दररोज सकाळी ते रात्री उशिरापर्यंत कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर गर्दीने गजबजून गेलेला असतो. या कोंडीतून प्रवासी, वाहन चालक यांची मुक्तता करावी आणि सुरू असलेली स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने कल्याण बस आगारातील बाहेरगावी जाणाऱ्या बस, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बस दुर्गाडी घाट, केडीएमटी गणेश घाट आगार येथून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- भात खरेदीत घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या एका लोकप्रतिनिधीचा सहभाग; भाजप आमदार संजय केळकर यांचा गंभीर आरोप 

बाहेरगावच्या बस गणेशघाटावर

राज्याच्या विविध भागातून एसटी बस कल्याण आगारात येतात. या बस यापुढे कल्याण रेल्वे स्थानकाजवळील बस आगारात येणार नाहीत. या बस मुरबाड रस्त्यावरील केडीएमटीच्या गणेशघाट आगारातून सोडण्यात येणार आहेत. पुणे, कोकणातून येणाऱ्या बाहेरच्या बस जय मल्हार हाॅटेल जवळ प्रवासी घेण्याचे आणि उतरविण्याचे काम करतील. त्यानंतर या बस मुरबाड रोडवरील गणेशघाटकडे निघून जातील.

परिवहन उपक्रमाच्या बस दुर्गाडीवर

केडीएमटी, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी, पनवेलकडे जाणाऱ्या बस कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात रस्त्यावर न येता या बस दुर्गाडी किल्ल्या जवळील गणेश घाट भागातून सोडण्यात येणार आहेत. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील प्रवाशांची मुरबाड रोड गणेशघाट, दुर्गाडी गणेशघाट येथे जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई, कल्याण परिवहन उपक्रमाच्या मिनी बस रेल्वे स्थानक ते गणेशघाट अशी प्रवासी वाहतूक करणार आहेत. सकाळ, संध्याकाळ ही सेवा असणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा- टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती

मार्चपर्यंत स्थलांतर

पुढील वर्ष मार्चअखेरपर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कल्याण बस आगारा जवळील काम पूर्ण झाले असेल. या भागात पुलाची उभारणी पूर्ण झाली असेल. त्यामुळे मार्च नंतर दुर्गाडी, केडीएमटी गणेशघाट येथे स्थलांतरित केलेली व्यवस्था पुन्हा कल्याण रेल्वे स्थानका जवळील बस आगारात केली जाईल. या भागातून नेहमीप्रमाणे बस सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

रिक्षा वाहनतळावर दोनच रांगा

रेल्वे स्थानकाजवळ मुबलक क्षमतेचा रिक्षा वाहनतळ नाही. बहुतांशी रिक्षा चालक रस्त्यावर उभे राहून प्रवासी वाहतूक करतात. मुख्य रस्त्यावर चार रांगांमध्ये उभे राहून रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असल्याने वाहतूक कोंडी होते. पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालता येत नाही. यापुढे रस्त्यावर फक्त एक मीटरवर धावणारी आणि एक शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा अशा दोन रांगांमध्ये रिक्षा उभ्या असतील. रस्त्यावरुन प्रवासी वाहतूक होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. रेल्वे स्थानक भागात विनापरवाना काळी पिवळी टॅक्सींना प्रतिबंध करण्यात येणार आहे. परवानाधारी काळी पिवळी टॅक्सी चालकांना दुर्गाडी गणेश घाट जवळ जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वाहतूक बेटे

कल्याण, डोंबिवलीतील अनेक वाहतूक बेटे वाहतुकीला अडथळा आणत असल्याने ती बेटे काढून टाकण्याचा सूचना वाहतूक विभागाने केली आहे. त्याचा विचार पालिकेकडून केला जाणार आहे. नादुरुस्त दर्शक सुरू केले जाणार आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर वाहने लावणाऱ्या वाहन चालकांना नोटिसा देण्यात येणार आहेत. बेवारस वाहने जप्त करुन त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतुकीत सुसुत्रता येण्यासाठी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाची काही या भागातील कामे पूर्ण करण्यासाठी हे महत्वाचे तात्पुरते बदल करण्यात येत आहे. बस, रिक्षा, अन्य वाहन चालकांनी या बदलासाठी सहकार्य करायचे आहे, अशी माहिती आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिल

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To decongest the traffic near kalyan railway station the bus from kalyan agar has been decided to leave from durgadi and murbad ganesh ghat dpj
First published on: 02-12-2022 at 19:09 IST