ठाणे: ठाणे- नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. अखेर साडे चार तासानंतर येथील रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. या दरम्यान २८ अप आणि २८ डाऊन रेल्वे सेवा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बसविलेले गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला होता. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले होते.
नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घणसोली आणि तुर्भे भागात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि कारखाने आहे. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप, मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जातात. ट्रान्स हार्बर मार्गावर २५० हून अधिक रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या नेरूळ, वाशी आणि पनवेलच्या दिशेने होतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक नऊ आणि ‘१० आणि १० अ’ या फलाटांवर रेल्वेगाड्या थांबविल्या जातात.
पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावर ‘एमएमआरडीए’ने ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसविण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत ब्लॉक घेतला होता. हे गर्डर तिरके झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक शुक्रवारी सकाळी ७.१० वाजल्यापासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती.
अखरे सकाळी ११.३० वाजता येथील रेल्वे सेवा सुरळीत झाली. या दरम्यान २८ अप आणि २८ डाऊन रेल्वे सेवा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुमारे साडे चार तास ही सेवा ठप्प असल्याने नोकरदारांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. प्रवाशांना सकाळच्या वेळेत बसगाड्या देखील वेळेत उपलब्ध होत नव्हत्या. रिक्षा चालक देखील येण्यास टाळाटाळ करत होते. अनेकांनी नवी मुंबईत कामानिमित्ताने जाणाऱ्या अनेकांना सकाळी पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. तर काही जणांनी ऑनलाईन कंपन्यांच्या सेवा वापरून कार्यालय गाठले.