Bhiwandi Accident : मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीतील पडघा कुकसे येथे गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात वडीलांसह सहा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे भिवंडी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सईम मकबूल खोत (४८) आणि मरियम खोत (६) असे अपघात मृत झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. पडघा येथील बोरिवली गावात हे कुटूंब राहत होते. सईम खोत गुरुवारी त्यांच्या पत्नी सुबी आणि सहा वर्षांची मुलगी मरियम हिला दवाखान्यात तपासणीसाठी दुचाकीवरून भिवंडी येथे घेऊन जात होते. ते पडघ्यातील कुकसे गावाजवळील साई धारा गोदाम कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर आले असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसली. या धडकेत खोत यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. या अपघातात सईम आणि मरियम हे दोघेही ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

पत्नी सुबी या गंभीर जखमी असून त्यांना ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातानंतर भिवंडीत शोककळा पसरली आहे.