कल्याण – उल्हास नदीच्या कल्याण परिसरातील पातळीत वाढ झाली आहे. नदी पात्राचे पाणी परिसरातील नागरी वस्ती, रस्ते मार्गावर आले आहे. रस्ते मार्गावरील पाण्यामुळे वाहने चालविणे अवघड झाल्याने वाहन चालक, प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. सकाळपासून पावसाचा जोर साधारण असला तरी उल्हास खोऱ्यात तुफान पाऊस सुरू असल्याने हे मुसळधार पावसाचे पाणी उल्हास नदी पात्रातून बाहेर पडून कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील रस्ते, वस्तीत शिरण्यास सुरूवात झाली आहे.

उल्हास नदी पात्रातून उल्हास खोऱ्यातील पाण्याचा ओघ सुरू असताना बारवी धारणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदीतील पाण्याची पातळी तासाने वाढत चालली आहे. काळू नदी दुथडी भरून वाहत आहे. उल्हास नदीच्या परिसरातील कल्याण -मुरबाड-माळशेजमार्गे- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाचा कल्याण ते रायते दरम्यानचा भाग समतल असल्याने उल्हास नदीचे पाणी म्हारळ, कांबा भागात महामार्गावर आले आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कल्याण मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर काम करणारे ३० कामगार रायता भागात पुराच्या विळख्यात अडकले होते. या कामगारांना बुधवारी पोकलेनमध्ये बसवून सुखरूप बाहेर काढण्यात आले. कल्याण जवळील शहाड रेल्वे फाटक परिसरातील वस्तीत आणि रस्त्यावर पाणी आले आहे. या भागातील नागरी जीवन विस्कळीत झाले आहे.

अटाळी, शहाड भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पाणी आले आहे. वाहन चालक पाण्यातून वाहने चालवित असल्याचे दृश्य आहे. डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा भागात उल्हास खाडीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे सत्यवान चौक ते गणेशघाट, गोपीनाथ चौक ते जगदांबा मंदिर भागात जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी घुसले आहे. देवीचापाडा, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा भागात नदी काठी भराव करून बेकायदा चाळींची उभारणी करण्यात आली आहे. या भरावामुळे पाणी वाट मिळेल तेथून पाणी नागरी वस्तीत शिरत आहे. कोपर, आयरे भागात सखल भागात पाणी शिरले आहे. या भागातील पायवाटा, वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी आले आहे. या भागातील नागरी वस्तीमधील पाणी उपसा पंपाच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

नागरी वस्तीत पाणी शिरलेल्या रहिवाशांनी आपले आवश्यक सामान घेऊन आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पालिका अधिकारी या रहिवाशांना पालिकेच्या संक्रमण शिबिरात हलविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देवीचापाडा भागात सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे, मनोज वैद्य, अनमोल म्हात्रे, संदेश पाटील आणि सहकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक साहाय्य करण्यास सुरूवात केली आहे. जलमय झालेल्या भागातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक नावाडी बोट घेऊन या भागात पाण्यातून फिरत आहे.