उल्हासनगरः राज्यात आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यात महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपात स्थानिक पातळीवर एकमेकांचे नगरसेवक पळवण्याची स्पर्धा सुरू आहे. उल्हासनगरात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या चार ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी कलानी गटात प्रवेश केला. हे चारही नगरसेवक भाजपचे जुने नगरसेवक म्हणून ओळखले जातात. उल्हासनगरात शिवसेना आणि कलानी गटाची युती आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भाजपच्या सहा नगरसेवकांना दोनच दिवसात पळवल्याची चर्चा आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात संपन्न होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण अंतिम झाले आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहे. मात्र या ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिका, नगरपालिकांमध्ये महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या प्रमुख पक्षांमध्येच मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने शिवसेना विरूद्ध भाजप असाच सामना बहुतांश महापालिकांमध्ये होणार हे निश्चित झाले आहे. उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकांमध्ये तसे चित्र निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिकेत सध्या शिवसेना आणि भाजपात मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात नसली तरी एकमेकांचे नगरसेवक पळवण्याची स्पर्धा सुरू आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना शिवसेनेने पक्षात प्रवेश दिला. हा भाजपसाठी धक्का मानला जात होता. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने भाजपच्या आणखी चार नगरसेवकांना गळाला लावले. विशेष म्हणजे यात माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजपचे जुने निष्ठांवत म्हणून ओळखले जाणारे जमनादास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, महेश सुखरामानी आणि राम पारवानी यांचा समावेश आहे. हे चारही नगरसेवक भाजपचा पाया मानला जात होते. निवडणुकांची आणि पक्ष संघटनांची मदार या माजी नगरसेवकांवर होती. मात्र त्यांचाच प्रवेश झाल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जातो.
माजी नगरसेवक फोडले पण कलानींसाठी…
उल्हासनगर महापालिकेतील भाजपच्या चार माजी नगरसेवकांना शिवसेनेच्या प्रयत्नाने पळवण्यात आले. त्यांचा प्रवेश खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. मात्र त्यांना शिवसेनेत न घेता टीम ओमी कलानी गटात नेण्यात आले. कलानी आणि भाजप असा उघड संघर्ष सध्या शहरात सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने येथे मोठी खेळी करत भाजपला धक्का दिला आणि कलानी गटाला सहकार्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या निवडणुकीत याच कलानी गटाचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढले होते. तर आता भाजपचे उमेदवार कलानींच्या चिन्हावर लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
