ठाणे : करोडो देशवासियांसाठी क्रिकेट हा खेळ म्हणजे आवडता विषय. आजही प्रत्येक घरा-घरात क्रिकेट विषयी चर्चा होताना दिसते. त्यातच क्रिकेट आणि मुंबई हे अनोखे नाते. या मुंबई शहराने अनेक दिग्गज क्रिकेटपटू देशाला दिले. याच क्रिकेटच्या पंढरीत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणूक होणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक कोण जिंकते याकडे क्रिकेटर आणि क्रिडा प्रेमींचे लक्ष आहे. यात एक नाव सातत्याने घेतले जात आहे. ते म्हणजे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचे. नेमके विहंग सरनाईक कोण आहेत. याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. वर्षभरापूर्वी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले होते. त्यामुळे एमसीएचे अध्यक्षपद रिक्त होते. या पदासाठी निवडणूक झाल्यानंतर त्यामध्ये अजिंक्य नाईक हे विजयी झाले होते. आता एमसीएची त्रैवार्षिक निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणूकीला राजकीय रंग लागला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाई हे अध्यक्षपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विद्यमान एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकते याकडे सर्वजण लक्ष लावून आहेत.
कोण आहेत विहंग सरनाईक ?
– १९८९ मध्ये जन्मलेले विहंग सरनाईक हे प्रतिष्ठित कमला रहेजा इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ‘विहंग ग्रुप’ या बांधकाम उद्योग समूहाचे संचालक आहेत. विहंग ग्रुपचे ठाण्यातील घोडबंदर भागात अनेक गृहप्रकल्प आहेत. त्यामुळे विहंग सरनाईक हे नाव क्रिकेट सोबतच बांधकाम व्यवसायातही जोडले जाते. सध्या ते एमसीए टी-२० लीगचे अध्यक्ष आहेत. ही लीग मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चालवली जाते आणि महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना क्रिकेटमधील संधी उपलब्ध करून देण्याचा तिचा उद्देश आहे. विहंग सरनाईक हे सक्रिय राजकारणात अतिशय कमी दिसतात. त्यांचे बंधू पुर्वेश सरनाईक यांच्याकडे शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेची जबाबदारी आहे. असे असले तरी क्रिकेटच्या निवडणूकीत विहंग सरनाईक यांचे नाव प्रसिद्ध आहे.
