ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली आणि आनंदनगर भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कासारवडवली उड्डाणपूलाचे लोकार्पण मंगळवारी (उद्या) होणार आहे. गेल्याकाही दिवसांपासून या उड्डाणपूलाचे लोकार्पण रखडले होते. या उड्डाणपूलाची ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहिनी खुली होणार असून प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

घोडबंदर मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने कासारवडवली उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील काही महिन्यांपासून या उड्डाणपूलाच्या कामांमुळे मुख्य मार्गिका अरुंद झाली होती. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसत आहे. उड्डाणपूलाखालील मार्गिकेवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कोंडीत भर पडते. हा पूल सुरू होणार अशी चर्चा मागील दोन आठवड्यांपासून सुरू होती. परंतु विविध कारणामुळे या उड्डाणपूलाचे लोकार्पण रखडले होते. अखेर या उड्डाणपूलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा (कासारवडवली ते गायमुख) मंगळवारपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

या उड्डाणपूलावर ३०० मीमी जाडीचा एम-४० ग्रेड सिमेंट काँक्रीटचा थर असून मध्यभागी असलेल्या भूयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई तसेच जेएनपीटी, बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहन चालकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाने केला.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामकाजात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मंगळवारी दुपारी कासारवडवली उड्डाणपूलाच्या उजव्यामार्गिकेचे लोकार्पण करणार आहे. कासारवडवली, गायमुख, घोडबंदर या भागात उड्डाणपुल व्हावे ही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पला मंजुरी होती. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री. हा उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे. पहिला टप्प्यात डावीकडील बाजू (कासारवडवली ते गायमुख) पूर्ण झाली असून ही मंगळवारपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उजवीकडील बाजूची (गायमुख -कासारडवली) पावसाळ्यानंतर स्थापत्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.