बदलापूरः मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बारवी धरणातून २८ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर दुपारी २ वाजेपर्यंत हा विसर्ग वाढला. हा विसर्ग १८२ घनमीटर प्रति सेकंद वाढल्याची माहिती बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. धरणातून होणारा विसर्ग वाढल्याने बारवी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. येथील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवीतून होणारा विसर्ग, कर्जत, माथेरान भागातून होणाऱ्या पावसामुळे पर्यायाने उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ नोंदवली जाते आहे.
ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणारे बारवी धरण यंदा ऑगस्ट महिन्यात भरले. १६ ऑगस्ट रोजी बारवी धरणातून दुपारी साडेतीनच्या सुमारास पाणी ओसांडून वाहू लागले. त्यामुळे ठाणए जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची तजवीज झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. त्याचवेळी सुरू झालेल्या संततधार पावसाने बारवी धरण क्षेत्रात अधिकच्या पाण्याची भर घातली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. बारवी धरणातून मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास २८ घनमीटर प्रति सेकंद पाणी विसर्ग होत होता. मात्र हळूहळू हा विसर्ग वाढत गेला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बारवी धरणातून ९३ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर ११ वाजण्याच्या सुमारास हा विसर्ग १०० घनमीटर प्रति सेंकद वाढला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाण्याचा विसर्ग आणखी वाढला. २ वाजता हा विसर्ग १८२ घनमीटर प्रति सेकंद सुरू होता.
बारवी धरणाच्या ११ दरवाज्यांमधून एक वाजता विसर्ग सुरू होता. यातील दरवाजा क्रमांक ७, ९ मधून सर्वाधिक विसर्ग सुरू होता अशी माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे बारवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे नदीकिनारच्या गावांमध्ये सखल भागात पाणी शिरले होते. बारवी नदीचे पाणी पुढे उल्हास नदीला येऊन मिळते. त्याचवेळी कर्जत, माथेरान भागात होत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. एकीकडे बारवी नदीत होणारी वाढ आणि दुसरीकडे बारवी धरणातून होणारा विसर्ग यामुळे कल्याण ग्रामीण भागात सखल भागात पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती.
रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान, नेरळ या भागात पाऊस वाढल्या, आणि बदलापूर परिसरातही पाऊस सुरू राहिल्यास त्याचा फटका सुरूवातीला कल्याण ग्रामीण मधील गावांना, तर नंतर बदलापूर शहराला पुराचा फटका बसण्याची भीती असते. त्यासाठी स्थानिक प्रशासनांनी सज्जता ठेवली आहे.