बदलापूर : कल्याणहून माळशेज घाटमार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसचे पुढील चाक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. गोवेली मामनोली दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांना मोठा धक्का बसला असून मोठा अपघात टळला आहे. या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. काही वेळाने क्रेन मागवून बस बाजूला करण्यात आली. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
कल्याण आगाराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कल्याण डेपोतून ही बस सुटलेली होती. येथून ही बस माळशेजमार्गे शिवाजीनगरकडे निघाली होती. रक्षाबंधनानंतरचा रविवार असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. कल्याण-मुरबाड मार्गावरील गोवेली-मामनोलीदरम्यान बस आली असता, चालकाच्या बाजूचे पुढील चाक अचानक निखळून पडले. त्याच क्षणी बस एका बाजूला कलंडली, परिणामी प्रवासी एकमेकांवर आपटले. काहींना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेनंतर प्रवाशांनी संताप व्यक्त करत चालक व वाहकाला घेराव घातला. “प्रवाशांनी भरलेली बस चालवण्याआधी तपासणी का केली नाही, आमच्या जीवाला धोका झाला असता तर जबाबदारी कोणाची, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली. प्राथमिक तपासात टायर आणि नटबोल्ट व्यवस्थित असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बसमुळे वाहतूक कोंडी
ही बस बंद पडल्याने कल्याण मुरबाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळानंतर क्रेनच्या सहाय्याने बसला रस्त्याच्या कडेला घेण्यात आले. तिथून या बसचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही दिशेला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे इतर वाहनांनाही याचा मोठा फटका बसला. त्यामुळे वाहन चालक संताप व्यक्त करत होते.