डोंबिवली – बुधवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून दादर दिशेने प्रवास करत असताना मुंब्रा येथील एका तरूणाने जवळील चाकूने प्रवाशांंवर लोकलमधील गर्दीत धक्का लागण्याच्या वादातून हल्ला केला. या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी झाले. प्रवाशांनी या हल्लेखोराला पकडून ठाणे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांच्या ताब्यात दिले. या तरूणाविरुध्द जखमी प्रवाशांच्या तक्रारीवरून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेख झिया हुसेन (१९) असे हल्लेखोर तरूणाचे नाव आहे. अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी अशी चाकू हल्ल्यात जखमी प्रवाशांची नावे आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले, कल्याण रेल्वे स्थानकातून बुधवारी सकाळी ९.४७ ची कल्याण-दादर जलद लोकल धावत होती. या लोकलमध्ये कल्याण रेल्वे स्थानकात अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी आणि इतर प्रवासी चढले. या गर्दीत मुंब्रा येथे राहणारा शेख हुसेन हाही चढला. लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. शेख आपणास मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरायचे आहे असे सांगत होता.

ही लोकल जलद आहे. ती मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबत नाही. तु तात्काळ कल्याण किंवा डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून घे असे इतर प्रवासी त्याला सांगत होते. शेखने लोकल सुरू झाल्यावर लोकलमधून उतरण्याचे प्रयत्न सुरू केले. सकाळच्या तुडुंब गर्दीत, कामावर जाण्याच्या विचारात असलेले इतर प्रवासी शेखच्या गर्दीतील हालचालींमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी शेखला आता लोकल मुंब्रा येथे थांबणार नाही. तू शांत एकाच जागेवर उभे राहा असे सांगितले.

तरीही शेख लोकल दरवाजात जाण्यासाठी चुळबुळ करत होता. त्याचे धक्के इतर प्रवाशांना बसत होते. धक्का लागणाऱ्या प्रवाशांनी शेखला जाब विचारला. शेखने त्यांच्याशी भांडण उकरून काढल्यावर प्रवाशांनी त्याला चोप दिला. मारहाण होताच संतप्त झालेल्या शेखने जवळील धारदार चाकू खिशातून बाहेर काढला. त्याने गर्दीतच त्याला मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर हल्ला केला. इतर प्रवाशांंनी शेखला रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत प्रवासी अक्षय, हेमंत आणि राजेश या चाकू हल्ल्यात जखमी झाले.

प्रवाशांनी कौशल्याने शेख जवळील चाकू ताब्यात घेऊन त्याला पकडून ठेवले. ठाणे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना संपर्क करून शेखची माहिती दिली. ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण लोकल येताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा बळाच्या जवानांनी शेख यांना ताब्यात घेतले. जखमी प्रवाशांना गुन्हा दाखल करण्यासाठी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. जवानांनी शेखला सुरक्षितपणे डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केला. शेख हा व्यसनी असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत पुढे आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth from mumbra attacked passengers with a knife in kalyan local train zws