आपण एखाद्या लांबच्या प्रवासासाठी रेल्वेमधून जातो, तेव्हा शक्यतो गाडीत पदार्थ विकायला येणाऱ्या विक्रेत्यांकडूनच खाण्यासाठी काहीतरी घेत असतो. गाडीमधील विक्रेत्यांमध्ये आणि रेल्वेमध्ये त्यासाठी करार झालेला असतो. परंतु, सध्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर IRCTC [इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड] वर चांगलीच टीका झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे, @ruchikokcha या हँडलरने एक्सवर केलेली पोस्ट. या पोस्टमध्ये तिने, ती आपल्या कुटुंबासोबत दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेमधून प्रवास करत असताना, मागवलेल्या व्हेज थाळीचे मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे आकरल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या तरुणीच्या कुटुंबाच्या मिळून एकूण १० सीट्स होत्या आणि त्या सर्वांना जेवण मागवायचे होते. तरुणीच्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये असणाऱ्या IRCTC च्या प्रतिनिधीने त्यांना एक व्हेज थाळी १५० रुपयांना असल्याचे सांगितले. तरुणीने “त्यांना बिल लागणार असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘व्हेज थाळी ८० रुपये + पनीर भाजी ७० रुपये = १५० रुपये’ असे दोन वेगवेगळ्या पदार्थांचे बिल लावले असल्याचे दिसले. त्यावर आम्ही त्यांना केवळ व्हेज थाळी असे बिल देण्यास सांगितले, तर ती व्यक्ती आमच्याशी तासभर हे बिल असेच बनवले जाते यावर हुज्जत घालत बसली.” तासभराच्या या वादानंतर, अजून एक कर्मचारी तिथे आला आणि त्याने सांगितले की, तुम्ही आधी मागितलेले बिल आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्याऐवजी तुम्ही हे ‘व्हेज थाळी ८० रुपये’वाले बिल घ्या आणि “इतकेच पैसे भरा.”

हेही वाचा : अरे बापरे! आपल्याच वडिलांना ओळखणे झाले मुश्कील…; जुळ्या मुलींच्या निरागस प्रतिक्रियेचा व्हिडीओ पाहा

यासोबतच “कर्मचारी मूळ किमतीपेक्षा अधिक दर लावून प्रवाश्यांची लूटमार करत आहे, असे समोर येते. तर IRCTC कृपया या गोष्टीची दखल घ्यावी, अशा चुकीच्या गोष्टींमुळे आपल्या भारतीय रेल्वेचे नाव खराब होते”, असे देखील @ruchikokcha हिने आपल्या एक्सवर [ट्विटर] लिहिल्याचे पाहायला
मिळते.

IRCTC अधिकाऱ्यांकडून लगेचच या पोस्टची दाखल घेतली गेली. सर्वप्रथम रेल्वे सेवा यांनी तिला “मॅडम, कृपया गाडीचा PNR क्रमांक आणि आपला फोन नंबर आम्हाला डायरेक्ट मेसेज [DM] करून पाठवावे. – IRCTC अधिकृत” असे उत्तर दिले. त्यानंतर “मॅडम तुम्ही ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले असून, त्या विक्रेत्यावर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला असून, जे कोणी जास्त दर आकारण्यात सहभागी होते, अशा सर्व परवानाधारकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे”, असेदेखील IRCTC ने सांगितले आहे.

@ruchikokcha हिने शेअर केलेल्या पोस्टला १२ तासातच तीन लाख ९८ हजार इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या सर्व प्रकारावर नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहा.

“बरं झालं तुम्ही बिल मागून घेतलं. अनेकदा अशी फसवणूक केली जाते, पण कुणाच्या ती लक्षात येत नाही. एवढंच नाही तर टीटी कडेदेखील तक्रार नोंदवण्यासाठी एक वही असते”, असे एकाने लिहिले. “बिल हे ऑर्डरसोबतच द्यायला हवे. कृपया याकडेदेखील IRCTC ने लक्ष द्यावे”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने “@ruchikokcha आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद आणि IRCTC तुमचेदेखील त्वरित यावर कारवाई केल्याबद्दल आभार”, असे लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc railway response on the accusation of overcharging of veg thali after x post went viral dha