भाईंदर : मिरा रोड येथील दिवाणी व सत्र न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे न्यायालयाच्या बाहेरील परिसर हा मोकळा झाला आहे.
मिरा-भाईंदर शहरात रस्त्याच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत उभ्या राहिलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे महापालिकेचे धोरण आहे. वाहतूक पोलिसांकडूनही रस्ते मोकळे करण्यासाठी अशा वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून जप्त वाहनांसाठी साठवण जागा उपलब्ध नसल्याने ही कारवाई ठप्प झाली होती. परिणामी शहरात अनेक ठिकाणी बेवारस वाहने उभी असल्याचे चित्र दिसत होते.
यामध्ये मिरा रोड येथील दिवाणी व सत्र न्यायालयाबाहेरही काही वाहने दीर्घकाळापासून उभी होती. यामुळे न्यायालय परिसराच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात लोकसत्ता वृत्तपत्राच्या वसई-विरार सहदैनिकात १७ ऑक्टोबर २०२५ रोजी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या बातमीची दखल घेत महापालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत न्यायालयाबाहेरील बेवारस वाहने हटवली. तसेच, भविष्यात या ठिकाणी पुन्हा वाहने उभी राहू नयेत म्हणून हा रस्ता ‘ना-वाहनतळ क्षेत्र’म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.