भाईंदर : मिरा रोड येथील स्मशानभूमितील पत्रे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी थेट आतील भागात पडत आहे. यामुळे अंत्य विधीसाठी येणार्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मिरा रोडच्या जॉगर्स पार्क उद्यानाजवळ महापालिकेची स्मशानभूमि आहे. या संपूर्ण परिसरात ही एकमेव स्मशानभूमि असल्याने नागरिक अंत्य विधीसाठी या ठिकाणी येतात. येथे लाकडांसह गॅस दाहिनीचीही सोय उपलब्ध आहे. त्यामुळे स्मशानभूमिच्या देखभाल व दुरूस्तीवर महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, या कामांमध्ये होणाऱ्या निकृष्ट दर्जामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नुकतेच स्मशानभूमितील पत्र्याला गळती लागल्याची नवी समस्या समोर आली आहे. परिणामी, अंत्य विधीसाठी आलेल्या नागरिकांना एका ठिकाणी उभे राहणे कठीण झाले आहे. तसेच, खाली बसवलेल्या लाद्यांवर पाणी साचल्याने त्या निसरड्या होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.
महापालिका प्रशासन इतका खर्च करूनही प्राथमिक सुविधा न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गळतीच्या समस्येबाबत अद्याप अधिकृत तक्रार नोंदवली नसली तरी, अशी समस्या असल्यास लवकरच ती दूर केली जाईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
कोट्यावधीचा खर्च
मिरा भाईंदर महानगरपालिकेने आतापर्यंत या स्मशान भूमीच्या उभारणीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. नुकतेच या स्मशानभूमीतील चिमण्यांची व पत्र्याचे काम करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही महिन्यातच गळतीची समस्या उभी राहिल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.