भाईंदर : घोडबंदर किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर १०५ फूट उंच भगव्या ध्वजाबाबत पुरातत्त्व विभागाने पुन्हा फटकारल्यानंतर हा ध्वज किल्ल्याबाहेरील भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा देखभाल व दुरुस्तीच्या दृष्टीने मिरा-भाईंदर महापालिकेला दत्तक स्वरूपात देण्यात आला आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागासोबत करार करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने महापालिकेकडून किल्ल्याच्या विकासाची कामे केली जात आहेत.दरम्यान, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीनिमित्त या किल्ल्यावर स्वराज्याचे प्रतीक म्हणून १०५ फूट उंच भगवा ध्वज आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आला होता. एखाद्या गडकिल्यावर फडकवला जाणारा हा राज्यातील पहिलाच ध्वज असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
मात्र कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सदर ध्वज उभारण्यात आल्याचा आरोप पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आला होता. तसेच किल्ल्यावर अशा प्रकारे ध्वज उभारल्यामुळे किल्ला संवर्धन नियमांचा भंग झाल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे हा ध्वज हटवण्याच्या सूचना पुरातत्त्व विभागाकडून महापालिकेला देण्यात आल्या होत्या. परंतु या सूचनांची अंमलबजावणी दीर्घकाळ प्रलंबित होती.
दरम्यान, घोडबंदर किल्ल्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासंदर्भात नगरविकास विभागात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान घोडबंदर किल्ल्यावरील बेकायदेशीर ध्वज हटवण्याबाबत पुन्हा पुरातत्त्व विभागाकडून महापालिकेला सूचना देण्यात आल्या. तसेच, ध्वज न हटवल्यास अन्य विकासकामांना परवानगी देणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावरून सदर ध्वज किल्ल्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.
ध्वजाचीही दूरवस्था
घोडबंदर किल्ल्यावर उभारलेला १०५ फूट उंच भगवा ध्वज हा खाडीकिनारी असल्याने सतत जोरदार वारे वाहतात. परिणामी अवघ्या काही दिवसांतच ध्वज फाटत असल्याची समस्या नेहमीच उद्भवत असते.
