भाईंदर: मिरा भाईंदर शहरात मराठी बोलण्यावरून सुरु झालेल्या वादाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढून आंदोलन केले तर मनसेने आपली भूमिका ठाम ठेवत याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मिरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकताच घडली होती. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मराठी सक्तीवरून झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी आंदोलन पुकारले असून गुरुवारी शहरातील बहुतांश भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. संघटनेच्या प्रतिनिधींनी उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचा भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील निषेध केला असून आंदोलन व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
मिरा भाईंदर मध्ये व्यापारी संघटनाने पुकारलेल्या आंदोलनाला दुकानदारांनी समिश्र प्रतिसाद दिला. यात मोठ्या संख्येने दुकानदार एकवटले होते.मराठी भाषेचा सन्मान करण्याची आमची भूमिका आहे, मात्र एखाद्या मराठी बोलण्यास भाग पाडण्यासाठी थेट हिंसा करणे हे चुकीचे असून याचा विरोध करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
गुरुवारी व्यापारी संघटनांनी मिरा भाईंदरमध्ये काढलेल्या मोर्चा व आंदोलनाचा मनसे पक्षाने विरोध केला आहे. सदर मोर्चा भाजप पुरस्कृत असून, त्यातून मराठी माणसाला डीवचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यामुळे येत्या ७ जुलै रोजी मराठी नागरिकांतर्फे देखील शहरात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्या दिवशी व्यापाऱ्याने केलेल्या चुकीची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जाईल, असे जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
“शहरात सुरु असलेल्या वादावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. या प्रकरणात आरोपींवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वांनी शहरात शांतता राखण्याचे काम करावे.” – प्रकाश गायकवाड, पोलीस उपायुक्त