वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटिकरणामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. या उंचीमुळे वर्सोवा ते विरार फाटा या दरम्यान असलेल्या उड्डाणपुलांच्या संरक्षित कठड्यांची उंची कमी झाली आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणारी वाहने त्या पुलावरून खाली कोसळून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचून राहणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. यातून सुटका व्हावी यासाठी महामार्गाचे काँक्रिटिकरण करण्यात आले आहे. या काँक्रिटीकरणानंतर रस्त्यांची उंची वाढली आहे.
या वाढलेल्या उंचीचा परिणाम महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर झाल्याचे दिसून येत आहे. वर्सोवा पुलापासून ते विरार फाट्या पर्यँत ससूनवघर, मालजीपाडा, नायगाव, चिंचोटी, सातीवली फाटा, वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, विरार आणि शिरसाड असे उड्डाणपूल लागतात. या उड्डाणपुलांना दोन्ही बाजूने सुरक्षा कठडे तयार करण्यात आले आहेत.
मात्र रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे जे सुरवातीला अस्तित्वात असलेले कठडे आहेत ते आता अपुऱ्या उंचीचे झाले आहेत. सुरवातीला कठड्यांची अडीच ते तीन फूट असलेली उंची दीड ते दोन फुटावर आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दररोज असंख्य वाहने या पुलावरून ये जा करतात. काही वेळा वाहनांचा वेग अधिक असतो अशा वेळी अपघात घडल्यास थेट वाहने पुलावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी राष्ट्रीय महामार्गावर अपुऱ्या उंचीचे झालेल्या कठड्यांची उंची वाढविण्याची मागणी पुढे येत आहे. अनेकदा पुलावरच अवजड वाहनांचे अपघात घडतात. अशी वाहने सुद्धा खाली कोसळण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील मिश्रा यांनी सांगितले आहे.
पुलाचे खालील बाजूचा भागा शहरात ये जा करण्याचा मुख्य मार्ग असल्याने त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांची व वाहनांची गर्दी असते अशा वेळी जर घटना घडली तर अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाण पुलांच्या कठड्यांची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कठड्यांना जॅकेटिंग करणार
महामार्गावर रस्त्याची उंची वाढली असल्याने पुलावरील कठड्यांची उंची कमी झाली आहे. या पुलावर कठडे सुरक्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या कठड्यांची उंची वाढून त्याला जॅकेटिंग करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाली की निविदा प्रक्रिया राबवून ही कामे प्राधान्याने पूर्ण करू असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
यापूर्वी घडलेल्या दुर्घटना
- २३ जून २०२५ वर्सोवा पुलावरून टँकर खाडीत कोसळून अपघात घडला होता.
- ३० मार्च २०२५ मनोर मस्तान उड्डाणपुलवरून ट्रक खाली कोसळला होता. यात वाहनचालकाचा मृत्यू झाला होता.
- मार्च २०२५ मध्ये विरार खानिवडे येथील तानसा नदीत ट्रेलर कोसळून भीषण अपघात घडला होता.
खड्डे ही कायम
वर्सोवा पूल ते विरार फाट्या दरम्यान ससूनवघर, मालजीपाडा, रेल्वे उड्डाण पूल,पेल्हार, नालासोपारा फाटा, चिंचोटी यासह अन्य ठिकाणी काँक्रिटिकरणावर खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे येथून ये जा करताना मोठ्या अडचणी येत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी टायर मार्क आहे त्यावर दुचाकी चालविताना अडचणी येत आहेत असे दुचाकी चालकाने सांगितले आहे.