भाईंदर :-दहिसर पथकर नाका मुंबई अहमदाबाद महामार्गवर स्थलांतरित करण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. या संदर्भात नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला दहिसर पथकर नाका वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबत शासकीय बैठक घेऊन घोषणा करण्यात आली आहे. मात्र हा पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या जागेवरून मोठा वाद उभा राहिला आहे.यापूर्वी हा पथकर नाका वर्सोवा येथील नर्सरी जवळ स्थलांतरित केला जाणार रस्त्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती.मात्र यामुळे वन विभागाची जागा बाधित होत असल्यामुळे यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप नोंदवला होता.तर यामुळे आसपासच्या गावावर मोठा प्रभाव पडणार असल्याने घोडबंदर गावासह भूमिपुत्र संघटनेने यास विरोध केला आहे.
त्यामुळे पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा करून गोत्यात अडकण्याची भीती शिवसेनेवर आली आहे. दरम्यान आता हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील चार किलोमीटर लांब वर्सोवा पुलापुढे पथकर नाक्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शासनाकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. तर या संदर्भात नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.त्यामुळे आता पथकर नाका स्थलांतरित करण्याचा अंतिम निर्णय केंद्र शासनाच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे.