वसई: वनविभागाकडून तुंगारेश्वर पर्वतावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. मात्र श्रावण महिन्यात त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना प्रवेश शुल्क माफ केले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वसई तालुक्याच्या पूर्वेकडील भागात तुंगारेश्वर पर्वत आहे. या पर्वतावर तुंगारेश्वर देवस्थान आहे. निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत असलेल्या श्रीतुंगारेश्वर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने सन २००० साली ‘क’ वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त शंकर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात.
तुंगारेश्वर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटक यांच्याकडून अभयारण्य असल्याने वन खात्याकडून ७१ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले जाते. या पर्वतावर शंकर महादेवाचे मंदिर असल्याने श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. या भाविकांना श्रावण महिन्यात तरी प्रवेश शुल्क माफ करावा या मागणीसाठी नुकताच बोईसरचे आमदार विलास तरे यांनी श्रावण महिन्यात तरी भाविकांकडून शुल्क घेऊ नये अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली होती.
त्यानुसार श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांसाठी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावण महिना संपेपर्यंत हे प्रवेश शुल्क आकारले जाणार नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे वसई तालुक्यातील तसेच ठाणे, पालघर, बोईसर, डहाणू, वसई, नालासोपारा, विरार आणि मुंबई परिसरातून दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा माजी आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे श्रावण महिन्यात भाविक भक्तांना शुल्क माफ करावे असा मुद्दा लावून धरला होता.