Vasai Virar Update: वसई: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकात झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरातील महत्त्वाच्या शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर वसई विरार रेल्वे स्थानकात सुरक्षा दलांकडून तोडफोड विरोधी (Anti-Sabotage) तपासणी मोहीम राबविण्यात आली.
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर हा स्फोट झाला. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून इतर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर, मुंबई, ठाणे, पालघर, अशा विविध ठिकाणी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर, धार्मिक स्थळांवर आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे.
वसई विरारमध्ये पोलीस आयुक्तालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांना सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या रेल्वे स्थानकात सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून तोडफोड विरोधी (Anti-Sabotage) तपासणी मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये रेल्वे स्थानक फलाट, स्थानकाच्या आसपासची जागा, पादचारी पूल, नोंदणी कक्ष, प्रवाशांचे सामान आणि पार्सल यांची श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तरी रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्याची माहिती त्वरित देण्याचे आवाहन केले आहे.
