भारत हा तरुणांचा देश आहे, असे नेहमी म्हटले जाते, पण या तरुण देशात अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची काळजी हे आव्हान ठरत आहे. भविष्यात हे आव्हान अधिक गंभीर रूप धारण करू शकते. छत्रपती संभाजीनगर येथील ‘स्नेह सावली’ विशेष काळजी केंद्र हे या प्रश्नाच्या निराकरणाकडे टाकलेले एक आश्वासक पाऊल आहे…

जगण्याची उमेद गमावून बसलेलेल्या, आजारांनी ग्रासलेल्या, ज्यांना आधार देणारे कोणीच नाही अशा व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य डॉ. बालाजी आणि डॉ. शिल्पा आसेगावकर करत आहेत. त्यांच्या ‘स्नेह सावली’ या केंद्राने आजारांमुळे पूर्ण परावलंबित्व आलेल्यांना पुन्हा स्वतच्या पायांवर उभे केले आहे.

बीड वळण रस्त्यावर प्रसिद्ध बजाज रुग्णालयाच्या बाजूला दोन मजली इमारतीत सध्या संस्थेचे कामकाज चालते.

स्नेह सावली केअर सेंटर

Sneh Sawali care center

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा दशमेशनगर

● चालू खाते क्रमांक : ९१२१००१०८४६४

● आयएफएससी : सीओएसबी००००९१२

मनोज काथार यांना वाटत असे, की आपल्या पायांना स्प्रिंग बांधल्या आहेत. आपण जमिनीवर पाय ठेवूच शकत नाही, चालणे तर फार दूरची गोष्ट. ते घरातच पडून राहत. घरी त्यांचा सांभाळ आई आणि भाऊ करत. वय वाढत गेले. आई धुणी-भांडी करत असे आणि भाऊ सायकलच्या दुकानात कामाला होता. मनोज यांची काळजी कोण घेणार असा प्रश्न त्यांना पडत असे. एखादा काळजीवाहक (केअर टेकर) नेमायचा तर त्याला द्यायला पैसे कोठून आणायचे? मनोज ‘स्नेह सावली काळजीवाहू केंद्रा’त आले. आता ते ४६ वर्षांचे आहेत आणि चालू लागले आहेत. पायरी चढता येणे हे आजही त्यांच्यासाठी आव्हान आहे.

अंबाजोगाईच्या अलका रुद्रावार यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्या अंथरुणाला खिळून होत्या. काही दिवस त्यांना सांभाळल्यानंतर त्यांची २४ तास सुश्रूषा कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. त्यांचा भाचा पुढे आला. त्याने अलकाताईंना स्नेहसावलीमध्ये आणले. गेली सात वर्षे त्या या संस्थेत आहेत. आता चालू लागल्या आहेत. स्वत:ची कामे स्वत: करण्याइतपत ताकद त्यांच्यात आली आहे. या संस्थेतील काही जण निराधार आहेत. काहींचे नातेवाईक आहेत, पण शुश्रूषा करणारे कोणी नाही. २४ तास काळजी घ्यावी लागेल, असे अनेक जण असतात. त्यातील गरजू आणि निराधार व्यक्तींचा ‘स्नेह सावली’ सांभाळ करते. अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तींच्या घरातील अन्य सदस्यही सतत तणावाखाली असतात. अशा घरांमध्ये कोणी विवाहोत्सुक असेल तर अशा तरुणांचे लग्नही होणे अवघड.

वृद्धावस्थेत २४ तास काळजीची गरज असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे, हे लक्षात घेऊन डॉ. बालाजी आणि डॉ. शिल्पा आसेगावकर यांनी काम सुरू केले. आईच्या पायाचे हाड मोडल्याने त्यांची देखभाल कशी आणि कोणी करायची या प्रश्नाचे उत्तर शोधताना या संस्थेचा जन्म झाला. अनेकदा दुर्धर आजारांत उपचार निष्प्रभ ठरू लागले, की डॉक्टरही सांगतात- आता यांची केवळ सेवा करा. पण ती नेमकी कशी करायची हेच कळेनासे झालेले असते. येथेच स्नेह सावलीचे काम सुरू होते. बऱ्याचदा बाहेरून बघणाऱ्यांना हा वृद्धाश्रम असावा, असे वाटते, पण हे विशेष काळजी घेणारे केंद्र आहे. अशा काळजी केंद्रांची भविष्यात मोठी गरज भासेल असे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होते, म्हणूनच २५ जुलै २०१८ रोजी १६ खाटांचे केंद्र सुरू करण्यात आले.

सुरुवातीला मधुकर कथने नावाची व्यक्ती आली. कथने मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे. ते निराधार होते. आजाराने ग्रासलेले होते. मंदिरात राहायचे. एक आजीही आल्या ज्यांना कोणीच नातेवाईक नव्हते. त्या संस्थेत आल्या आणि पाच वर्षे राहिल्या. ‘स्वत:चे काम स्वत:च करायचे’ हे सूत्र आयुष्यातून हरवून बसलेली ही माणसे होती. आज संस्थेत असे ५५ जण आहेत. ज्यांना काळजी व शुश्रूषेची गरज आहे. यातील काही जणांच्या नातेवाईकांची त्यासाठी पैसे भरण्यासारखी ऐपत आहे. ते स्वत:चा खर्च करतात. काहींचे उपचार सवलतीच्या दरात केले जातात. पण निराधार व्यक्तींची शुश्रूषा पूर्णत: मोफत केली जाते. या वयात पाणी पिण्याचीही आठवण करून द्यावी लागते. स्मृतिभ्रंश होतो. अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अनेकदा फोड येतात. त्याला स्थानिक बोली भाषेत ‘टिचरं’ म्हणतात. अशा व्यक्तींची वरचेवर कूस बदलणे हे एक महत्त्वाचे काम असते. दर तीन तासांनी कूस बदलली जाते. काहींना नळीतून नाकावाटे आहार द्यावा लागतो.

मानसोपचाराचे शिक्षण घेणाऱ्या आणि या ५५ व्यक्तींबरोबर राहून काम करणाऱ्या अक्षया पाटील यांच्या मते या सर्वांना ‘तुम्ही आम्हाला हवे आहात’, असा संदेश स्पर्शातून, बोलण्यातून, वागण्यातून द्यावा लागतो. त्यात सातत्यही लागते. होते असे की अनेकांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यांना यातील काहीच स्मरत नाही. जेवण भरवावे लागते. अशा व्यक्तींसाठी स्वच्छता औषधाइतकीच महत्त्वाची असते. सण एकत्रित साजरे करणे, मिळून हरिपाठ म्हणणे, एखादी सांघिक कृती आणि प्रत्येकाचा छोटा-छोटा व्यायाम यातून एक भावनिक बंध तयार होतो आणि जगण्यातील वेदना ही मंडळी विसरून जातात. अगदी छोट्या-छोट्या कृतींतून, उपचारांतून या वयातील आयुष्य सुकर होत जाते. उदाहरणार्थ, चार वाजता चहा-कॉफी असे काही दिले की बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, असे लक्षात आल्यानंतर आता चार वाजता फळे दिली जातात.

विमल आंबेकर यांना संधिवात आहे. त्यांचे पती साखर कारखान्यात नोकरी करत. ते वारले. त्यानंतर त्या काही दिवस त्यांच्या बहिणीकडे राहिल्या. संस्थेत आल्या तेव्हा त्या कमालीच्या कृश होत्या. संधिवातामुळे बोटे वाकडी झाली होती. तशात जगण्याची ऊर्मीही लोप पावत चालली होती. पण त्या पूर्वी विणकाम करत. त्यांना लोकर व सुया आणून दिल्या आणि आता त्या दिवसभर विणकाम करत राहतात. डॉ. बालाजी आसेगावकर यांच्यासाठी त्यांनी स्वेटर शिवला आहे.

अनेकदा पैसा असूनही काळजी घेणारे कोणीच नसते. यश आंबेकर हा असा विशेष गरजा असणारा मुलगा. त्याला दिवसभर मोबाइल फोन पाहत राहण्याची सवय लागली होती. तो ‘स्नेह सावली’त येऊ लागला. आता तो दिवसभर तिथेच राहून रात्री घरी जातो. इथे आल्यापासून त्याची मोबाइल फोनची सवय सुटली. महिला व बालकल्याण विभागाने दोन निराधार गतिमंद मुलांचा सांभाळ करण्याची शिफारस केली. त्यांनाही सेवा संस्थेत सामावून घेण्यात आले.

काहींना अगदी सोपी कामे देऊन त्यांच्या बुद्धीला चालना देत राहावे लागते. म्हणजे वर्तुळ काढून दाखवा, परिच्छेद लिहून दाखवा, असे सांगितले जाते. एखाद्या लहान मुलाचा सांभाळ करावा अशीच स्थिती. वयाने वाढलेल्या आणि आजाराने त्रस्त असणाऱ्या या मंडळींच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी जवळपास तीन डॉक्टर दररोज नि: शुल्क सेवा देतात. संस्थेचा कारभार ३५ कर्मचाऱ्यांनी आपल्या खांद्यांवर पेलला आहे. अगदी कूस किती वेळा बदलली, याचीही नोंद ठेवली जाते. या सर्व मंडळींना वेतन दिले जाते. अशा प्रकारे निराधार, ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा आजारी व्यक्तींची देखभाल स्नेह सावलीत केली जाते.

हा सारा कारभार चालतो तो भाड्याच्या इमारतीत. आता पाच मजली इमारत बांधण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. त्यातील दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून तिसरा मजला पैशांअभावी रखडला आहे. हे काम पूर्ण झाल्यास किमान १०० जणांना सेवा देता येईल, असा प्रकल्प उभा करण्याचा संस्थेच्या विश्वस्तांचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक आहे, ती दात्यांच्या हातभाराची.

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

धनादेश येथे पाठवा…

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५